आधार कार्डासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला. न्यायिक आढाव्यानंतर आज आधारची संकल्पना मान्य करण्यात आली. आधारच्या वैधतेवर शिक्कमोर्तब करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. बुधवारी दुपारी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

तंत्रज्ञानाला नाकारु शकत नाही. ते सुशासनाचे एक साधन आहे. कुठलेही सरकार तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करु शकत नाही असे जेटली म्हणाले. आतापर्यंत १० कोटी पेक्षा जास्त लोकांनी आधारसाठी नोंदणी केली आहे. पात्र असलेल्या लाभार्थ्यांची ओळख पटवून वर्षाला आम्ही ९० हजार कोटी रुपयांची बचत करत आहोत असे जेटली यांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष आधार कार्डाचा प्रणेता आहे पण आता तेच या कार्डाचे सर्वात मोठे विरोधक आहेत असे जेटली म्हणाले. काँग्रेसने आधारची संकल्पना मांडली पण त्याची कशी अंमलबजावणी करायची ते त्यांना कळले नाही अशा शब्दात जेटलींनी काँग्रेसवर टीका केली. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष नंदन नीलकेणी आणि विद्ममान सरकारमधील मुकुल पांडे यांच्या कार्याचे जेटली यांनी यावेळी कौतुक केले.