सर्वसाधारण भारतीय जनता आणि समलैंगिक समाज यांच्यामध्ये होत असलेला पक्षपातीपणाविरोधात आज मोठा विजय मिळाला असून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या पुरोगामी आणि निर्णायक निकालाचे आम्ही स्वागत करतो, असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.


समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. यावेळी न्यायालयाने समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

या निकालावर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन प्रतिक्रिया देताना, या निर्णायचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे भारतीय समाजात अधिक समता आणि सर्वसमावेशकता निर्माण होईल आशी आशा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

आपल्याला पूर्वग्रहांमधून मुक्त व्हावं लागेल, सर्वसमावेशक व्हावं लागेल तसंच सर्वांना समान अधिकार मिळतील याची हमी घ्यावी लागेल असे सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचं विविध स्तरांमधून स्वागत होत आहे. तसंच काही कट्टर विचारसरणीच्या लोकांनी या निकालास विरोध देखील करण्यास सुरूवात केली आहे. धार्मिक पगडा असलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर या निकालाला विरोध करताना निसर्गनियमांच्या विरोधात जाण्यासाठी व स्वैराचारासाठी या निकालामुळे वाव मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.