जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरचा आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनेही धसका घेतल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या पार्श्वभूमीवर विधान केलं आहे. आम्ही पुढील ३० दिवसांसाठी युरोप ते अमेरिका असे सर्व प्रवास रद्द करत आहोत. शुक्रवार मध्यरात्रीपासून नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडूनही करोना व्हायरसला महारोगराई म्हणून संबोधण्यात आलं आहे. जगभरातील तब्बल १०० देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. शिवाय, आतापर्यंत तब्बल चार हजार पेक्षा अधिक जणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवरच जागतिक आरोग्य संघटनेने करोनामुळे जगात महारोगराई पसरल्याचे घोषित केलं आहे. याचबरोबर संपूर्ण जगाने एकजुटीने या जीवघेण्या व्हायरसशी लढावं, असं आवाहनही संघटनेकडून करण्यात आलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून पर्यटक व्हिसा १५ एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आला आहे. १३ मार्चपासून याची अंमलबाजवणी केली जाणार आहे. मात्र, यामध्ये राजकीय नेते, अधिकारी, संयुक्त राष्ट्र संघ व आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कर्मचाऱ्यांना सूट मिळणार आहे.