गुजरातमध्ये भाजपचा पराभव करणे हाच एकमेव उद्देश असून यासाठी काँग्रेसला साथ देण्याचे संकेत पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने दिले आहेत. ओबीसी कोट्याअंर्तगत पाटीदार समाजाला आरक्षण देण्यासाठी गुजरातमधील भाजप सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपला गुजरातमध्ये ८० पेक्षा जास्त जागा जिंकू देणार नाही असे त्याने म्हटले आहे.

पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेलने गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे हे ध्येय असल्याचे सांगितले. भाजपने आरक्षणावर निर्णय घेतला नाही तर याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील असा इशारा पटेलने दिला. गेल्या दोन वर्षांत आम्ही वेळोवेळी सरकारकडे आरक्षणाची मागणी केली. सरकारला निवेदन दिले, प्रेझेंटेशनही दिले. पण सरकारने अजूनही निर्णय घेतला नाही असे हार्दिकने स्पष्ट केले. सरकारने आरक्षणासंदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट करावी असेही त्याने सांगितले.

आरक्षणासाठी आमचे आंदोलन थांबलेले नाही. हे आंदोलन पुन्हा कधीही उग्र रुप धारण करु शकेल असा सूचक इशाराही त्याने दिला. निवडणुकीत १५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण आम्ही त्यांना ८० पेक्षा जास्त जागा जिंकू देणार नाही असे हार्दिकने म्हटले आहे.

गेल्या निवडणुकीत गुजरातमधील १८२ जागांपैकी भाजपने सर्वाधिक १२१ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला ५७ जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसने आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यास आम्ही त्यांच्यासोबत युती करण्यास तयार आहोत असे हार्दिकने स्पष्ट केले. यंदाची निवडणुक काँग्रेस विरुद्ध भाजप अशी नसेल. यंदा तरुण, शेतकरी, महिला, पटेल, दलित असे सर्व घटक भाजपविरोधात लढतील असेही त्याने म्हटले आहे.