येत्या महिन्याभरात अमेरिका करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करणार असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. करोनाची साथ आपोआप जाईल, असे विरोधी विधानही त्यांनी पेनसिल्वानियात प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात केले.

तीन ते चार आठवडय़ांत लशीचे काम पूर्ण झालेले असेल, असे त्यांनी एबीसी न्यूजच्या कार्यक्रमात सांगितले. त्या आधी फॉक्स न्यूजच्या कार्यक्रमात त्यांनी लस येण्यास आठ आठवडे लागतील असे विधान केले.

३ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना पराभूत करण्यासाठी लस लवकर आणण्याकरिता ट्रम्प यांनी कंपन्या व वैज्ञानिकांवर दबाव आणला आहे, पण लस सुरक्षित असल्याची खातरजमा झाल्याशिवाय ती जारी केली जाणार नाही, अशी सामूहिक शपथ कंपन्या व वैज्ञानिकांनी घेतली आहे.

अमेरिकेचे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ अँथनी फाउची यांनी सांगितले की, लशीला वर्षअखेरीस मंजुरी मिळेल. ट्रम्प यांनी टाऊन हॉल येथील कार्यक्रमात कोविड १९ साथ फार गंभीर नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात या साथीने अमेरिकेत दोन लाख बळी गेले आहेत. नंतर ट्रम्प म्हणाले की, या लशीचे गांभीर्य मी नाकारत नाही, पण त्या विरोधात आम्ही अनेक उपाययोजना केल्या. ट्रम्प यांनी पत्रकार बॉब वूडवर्ड्स यांना ‘रेज’ नावाच्या पुस्तकासाठी ज्या मुलाखती दिल्या आहेत त्यात त्यांनी मुद्दामच करोना साथीचे गांभीर्य कमी दाखवण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. लोकांमध्ये भीती पसरू नये म्हणून असे केल्याची पुस्तीही त्यांनी त्या मुलाखतीत जोडली.

मंगळवारच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, करोना विषाणू तसाही आपोआप जाणार आहे पण लशीने तो लवकर जाईल. तुमच्यात हर्ड मेंटॅलिटी (समूह मानसिकता) तयार होते. प्रत्यक्षात त्यांना हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक प्रतिकारशक्ती म्हणायचे होते. सामूहिक प्रतिकारशक्तीने विषाणू जाईल पण लशीने तो लवकर जाईल.

मुखपट्टी ट्रम्प यांनी कधीच वापरली नाही. त्याचे समर्थन करताना त्यांनी सांगितले की, लोकांनाही मुखपट्टी वापरायला आवडत नाही. ती चांगली गोष्ट आहे असे त्यांना वाटत नाही.