खेळातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे शक्य नसल्याचे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख सर रॉनी फ्लॅनागन यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर खेळामध्ये भ्रष्ट वर्तन करणारे संघटित गुन्हेगारीशी संबंधित असतात. त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटित गुन्हेगारांशी संबंध असतात, असेही त्यांनी म्हटले आहे. भ्रष्ट व्यक्तींची तुलना त्यांनी राक्षसाशी केली आहे.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत फ्लॅनागन म्हणाले, खेळातून भ्रष्टाचाराचे संपूर्णपणे उच्चाटन करणे शक्य नसते, असे मला खरोखर वाटते. पण यामुळे कोणत्याही खेळाच्या चाहत्यांनी निराश होण्याचे कारण नाही. या क्षेत्रातील नियंत्रक आणि व्यवस्थापक बेकायदा कृत्ये रोखण्यासाठी जितके प्रयत्न करता येतील, तितके करत असतात. भ्रष्टाचाराला रोखता यावे, म्हणून शक्य तितके कडक निर्बंध लादले जातात. पण एवढे करूनही संपूर्ण भ्रष्टाचारमुक्ती शक्य नाही.
फ्लॅनागन २०१० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख आहेत.