29 September 2020

News Flash

आम्ही बॅकफूटवर दहशतवादाशी लढा देत नाही, सॅम पित्रोदा यांना जेटलींचं उत्तर

ज्यांना देशाची समज नाही तेच लोक असं वक्तव्य करतात असं अरुण जेटलींनी म्हटलं आहे

सॅम पित्रोदा यांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनीही त्यांनी उत्तर दिलं आहे. सॅम पित्रोदा यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यांना देशाची समज नाही तेच लोक असं वक्तव्य करतात अशी टीका त्यांनी केली. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. भारताच्या हवाई हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

जर गुरु असा असेल तर शिष्य किती निष्क्रिय असेल असा टोला यावेळी अरुण जेटली यांनी लगावला. आम्ही केलेले दोन्ही ऑपरेशन यशस्वी राहिले असून, आधी देशात घुसून दहशतवादी हल्ल्या करणाऱ्यांवर कारवाई व्हायची. पण आता जिथून दहशतवादाला सुरुवात होते तिथेच कारवाई केली जात आहे असं अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं. सॅम पित्रोदा आज पाकिस्तानच्या टीआरपीत पहिल्या क्रमांकावर असतील असा टोला यावेळी अरुण जेटली यांनी लगावला. कोणताही सामना बॅकफूटवर खेळत जिंकला जाऊ शकत नाही असं सांगताना देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही फ्रंट फूटवर आहोत असं अरुण जेटली यांनी सांगितलं.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅम पित्रोदा यांच्यावर निशाणा साधत काँग्रेसच्या वतीने त्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे अशी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘सर्वात विश्वासू सल्लागार आणि काँग्रेस अध्यक्षांच्या मार्गदर्शकांनी भारतीय सुरक्षा दलांचा अपमान करत काँग्रेसच्या वतीने पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे’.

पुलवामा येथील हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकमधील दहशतवादी तळांवर केलेले एअर स्टाइक या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोदा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पित्रोदा म्हणाले, भारताच्या या हवाई हल्ल्याबाबत मी न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये वाचले. त्यानुसार, भारताने खरंच असा हल्ला केला का? आपण खरंच ३०० दहशतवादी मारले? जर तुम्ही म्हणता की ३०० दहशतवादी मारले, तर सर्व भारतीयांना याचा पुरावा मिळायला हवा. कारण, या हल्ल्यात कोणीही ठार झालेले नाही असं आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते, असे त्यांनी सांगितले.

काही लोकांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवता येणार नाही, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकवर केलेल्या कारवाईची पद्धतही चुकीची होती, असे मतही पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. भारतावर अशा प्रकारचे हल्ले यापूर्वीही झाले आहेत. मुंबईतही असाच हल्ला झाला होता, तेव्हा देखील आपण विमाने पाठवू शकलो असतो. पण मला ही भूमिका पटत नाही, असे पित्रोदा यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 1:13 pm

Web Title: we will not fight terror while being on the backfoot answers arun jaitley to sam pitroda
Next Stories
1 मोबाइल जाहिरात क्षेत्रात अमेझॉनचं गुगल, फेसबुकला आव्हान
2 गौतम गंभीरचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
3 दिल्लीत ‘जैश- ए- मोहम्मद’चा दहशतवादी सज्जाद खानला अटक
Just Now!
X