कर्नाटकमधील बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होणार आहे. याचसंदर्भात बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमध्ये महत्वाचं मंत्रीपद असणाऱ्या ईश्वरप्पांनी भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये कोणत्याही मुस्लीम उमेदवाराला तिकीट देणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. बेळगाव हे हिंदूंचे केंद्र असून त्याचे समर्थन करणाऱ्यालाच तिकीट दिलं जाईल अशं ईश्वरप्पा म्हणाले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रविवारी ईश्वरप्पा यांनी यासंदर्भात भाष्य केलं.  “आम्ही हिंदू समुदायातील कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट देऊ शकतो. कुरुबा, लिंगायत, वोक्कलिबा किंवा ब्राह्मण समाजातील कोणत्याही व्यक्तीला आम्ही तिकीट देऊ. मात्र एक गोष्ट नक्की आहे की मुस्लिमांना आम्ही तिकीट देणार नाही,” असं ईश्वरप्पा म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, “भाजपा वगळता कोणत्याही पक्षामध्ये लोकशाही नाहीये,” असंही ते म्हणालेत.

ईश्वरप्पा हे राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ७० वर्षीय ईश्वरप्पा हे कुरुबा समाजाचे प्रातिनिधित्व करतात. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारची वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.  लोकांचा विश्वास जिंकून विजय मिळवू शकणाऱ्या उमेदवाराचीच राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते निवड करतील असा विश्वास ईश्वरप्पा यांनी व्यक्त केला. “आम्ही तिकीट कुरुबा किंवा लिंगायत किंवा वोक्कलिगा किंवा ब्राह्मण उमेदवाराला देऊ. मात्र मुस्लीम उमेदवार देणार नाही. बेळगाव हे हिंदूंचं केंद्र आहे. त्यामुळे इथून मुस्लीम उमेदवार देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,” असं ईश्वरप्पा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे.

कर्नाटकमधील कोप्पलमध्ये ईश्वरप्पा यांनी कुरुबा आणि इतर अल्पसंख्यांकांना संबोधित करताना, “काँग्रेस तुमचा वापर केवळ व्होट बँक म्हणून करत आहे. मात्र तुम्हाला तिकीट देत नाही. आम्ही मुस्लिमांना तिकीट देणार नाही. कारण त्यांचा आमच्यावर विश्वास नाहीय. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही तुम्हाला तिकीट आणि इतर गोष्टींही देऊ,” असं म्हटलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या जागांवरील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने विजय मिळवला होता.