केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या भारतीय किसान युनियने आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी काळात विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवण्यासाठी भारतीय किसान युनिनयने आता कंबर कसली आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते बलबीरसिंह राजेवाल यांनी आज पत्रकारपरिषदेत घोषणा केली आहे की, भारतीय किसान युनियन पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभा निवडणुकीत आपलं पथक पाठवेल आणि तेथील लोकांना भाजपा उमेदवाराला हरवण्यासाठी आवाहन करू. यावेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केले की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करणार नाही. मात्र भाजपाला हरवू शकतील अशा उमेदवारांना मतदान करण्याचे मतदरांना आवाहन करणार आहोत. नागरिकांना आम्ही शेतकऱ्यांबद्दल मोदी सरकारच्या असलेल्या धोरणाची माहिती देऊ, असं देखील यावेळी ते म्हणाले.

तर, यावेळी उपस्थित असलेले स्वराज भारतचे अध्यक्ष योगेंद्र यादव म्हणाले की, संयुक्त किसान मोर्चाची आज बैठक झाली. बैठकीत आम्ही १५ मार्चपर्यंत होणाऱ्या कार्यक्रमांना अंतिम रुप दिलं आहे. ६ मार्च रोजी जेव्हा आंदोलन १०० व्या दिवसात प्रवेश करेल, तेव्हा शेतकरी सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस वे विविध ठिकाणी अडवतील.

तसेच, शेतकरीविरोधी कायदा आणणाऱ्या भाजपाला आणि त्यांच्या आघाडीला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी आम्ही नागरिकांना आवाहन करणार आहोत. आम्ही निवडणूक असणाऱ्या राज्यांमध्ये जाऊ, हा कार्यक्रम १२ मार्च रोजी कोलकाता येथील जाहिरसभेपासून सुरू होईल. असंही योगेंद्र यादव यांनी यावेळी सांगितलं