जामिया येथे जो गोळीबार झाला असे प्रकार खपवून घेणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठणकावलं आहे. यासंदर्भात दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. या प्रकरणात जो दोषी आहे त्याला माफ करणार नाही असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. अमित शाह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातलं ट्विट केलं आहे.

आज दिल्लीतील जामिया या ठिकाणी गोपाल नावाच्या एका तरुणाने CAA विरोधातल्या रॅलीवर गोळीबार केला. शांततेने होणाऱ्या या रॅलीवर गोळीबार करण्यात आला. त्याआधी रामभक्त गोपाल या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवर या गोपाल नावाच्या मुलाने यासंदर्भातली पोस्टही लिहिली होती. गोपालने केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. या जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली असून या प्रकरणातल्या दोषीला माफ करणार नाही असं म्हटलं आहे. दिल्ली पोलीस दलाचे विशेष पोलीस आयुक्त प्रवीर रंजन यांना हे प्रकरण सोपवण्यात आलं आहे. गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी ते करतील असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

आज दिल्लीतील जामिया ठिकाणी CAA, NRC विरोधात विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रॅली सुरुही होणार होती. त्याचवेळी अचानक एक तरुण रस्त्यावर आला त्याने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या घटनेत एक विद्यार्थी जखमी झाला आहे. मात्र हे असले प्रकार खपवून घेणार नाही आणि जो दोषी आहे त्याला कठोर शिक्षा होईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.