‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणाचा एक भाग म्हणून केंद्र सरकार आसामसह ईशान्येकडील अन्य राज्यांना विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे दिली.

संपूर्ण ईशान्य भागांचा र्सवकष विकास करण्याच्या कामात आसाम हा केंद्रबिंदू असेल आणि हा भाग देशातील शक्तिशाली भाग म्हणून उदयास येईल आणि तो आमच्या अ‍ॅक्ट ईस्ट धोरणाचा भाग असेल, असेही मोदी म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री म्हणून सर्वानंद सोनोवाल यांचा शपथविधी समारंभ मंगळवारी पार पडला, त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.

देशाच्या सर्व भागांचा र्सवकष आणि संतुलित विकास व्हावा याकडे आमचे लक्ष आहे, देशाच्या पश्चिम भागाचा विकास झाल्याने आम्ही गप्प बसणार नाही, आसाम, बंगाल, बिहार, ओदिशा आणि संपूर्ण ईशान्य भाग यांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मोदी म्हणाले.