राफेल कराराच्या मुद्द्यावरून संसदेचं हिवाळी अधिवेशन तापणार यात काहीही शंका नाही. कारण राफेल घोटाळा हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा आहे. आम्ही त्यावरून गप्प बसणार नाही सगळ्या विरोधकांना एकत्र आणून त्याचा जाब विचारणार असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असे दिसते आहे. राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर सातत्याने टीका केली आहे. अनिल अंबानींच्या फायद्यासाठी या करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेरबदल केले असा आरोप राहुल गांधींनी वारंवार केला आहे. तसेच स्वतःला देशाचा चौकीदार म्हणवणारे मोदी चोर आहेत असाही आरोप राहुल गांधींनी वारंवार केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच नाही तर काँग्रेसच्या सगळ्याच दिग्गज नेत्यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आज तर शिवसेनेनेही राफेल घोटाळा हा बोफोर्सपेक्षा मोठा आहे अशी टीका केली आहे. अशातच काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी या घोटाळ्यावरून आम्ही सरकारला जाब विचारणार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर सगळ्या विरोधकांना राफेल घोटाळ्याचा जाब विचारण्यासाठी एकत्र आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.