फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार

पॅरिस : फ्रान्सचे आकर्षण असलेले  नॉत्रेदाम कॅथ्रेडल भीषण आगीत भस्मसात झाल्याने देशाला धक्का बसला असतानाच, हे चर्च पाच वर्षांच्या आत ‘अधिक सुंदर रीतीने’ पुन्हा बांधून काढण्याचा निर्धार देशाचे अध्य एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्यक्त केला आहे.

या चर्चच्या पुनर्बाधणीसाठी अनेक दशके लागतील असे काही तज्ज्ञांनी म्हटले असतानाच, मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मॅक्रॉन यांनी हेच काम जलदगतीने पूर्ण करण्याची घोषणा केली. या अरिष्टाने फ्रान्सची गतिशील होण्याची आणि एकत्र येण्याची क्षमता दाखवून दिली असल्याचेही ते म्हणाले.

गॉथिक वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे चर्च पुन्हा पूर्ववत करण्यासाठी फ्रासन्मधील गर्भश्रीमंत लोक आणि उद्योगपती यांनी आतापर्यंत ७०० अब्ज युरोंची (७९० अब्ज अमेरिकी डॉलर) मदत जाहीर केली आहे.

पर्यटकांचे मोठे आकषण असलेल्या या चर्चच्या छताचा बहुतांश भाग नष्ट झाला आहे, छपरावरील मनोरा कोसळला आहे, तसेच अनेक कलाकृती व तैलचित्रे हरवली आहेत. सुमारे ८ हजार पाईप असलेल्या मुख्य ऑर्गनचेही नुकसान झाले आहे. मात्र, या चर्चच्या भिंती, घंटा असलेले टॉवर आणि प्रख्यात असलेल्या स्टेन्ड-ग्लासच्या खिडक्या शाबूत आहेत.

आम्ही हे कॅथ्रेडल अधिक सुंदर रितीने पुन्हा बांधून काढू आणि हे काम पाच वर्षांच्या आत पूर्ण व्हावे अशी माझी इच्छा आहे, असे मॅक्रॉन म्हणाले. पॅरिसमध्ये २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिपिंक स्पर्धापूर्वी चर्चची पुनर्बाधणी पूर्ण व्हावी अशी त्यांची इच्छा असल्याचे संकेत यातून मिळाले.

दरम्यान, या ऐतिहासिक बांधकामाच्या पुनर्बाधणीत मदत करण्यास संयुक्त राष्ट्रसंघाचे सांस्कृतिक तज्ज्ञ तयार आहेत, असे युनेस्को जागतिक वारसा केंद्राच्या संचालक मेश्टहिल्ड रॉसलर यांनी म्हटले आहे.