पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी केलेल्या चांगल्या कामांसाठी प्रशंसा केली जावी असे म्हणने, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना महागात पडणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या अन्य खासदारांकडून या अगोदर याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर आता केरळ काँग्रेसनेही खासदार थरूर यांना स्पष्टीकरण मागीतले जाणार आहे.

खासदार शशी थरूर यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना,  मी मागील सहा वर्षांपासून सांगतो आहे की, आपल्याला पंतप्रधान मोदींच्या चांगल्या कामांची प्रशंसा केली पाहिजे. यामुळे ते जेव्हा चुका करतात तेव्हा आपण केलेल्या टीकांची विश्वासर्हता कायम राहते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी आक्षेप नोंदवल्यावर त्यांनी यात आपला हेतू चुकीचा नव्हता असे म्हटले होते.

खासदार शशी थरूर यांच्या या विधानाबाबत केरळ काँग्रेसकडून त्यांना स्पष्टीकरण मागितले जाणार आहे. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी सांगितले आहे की, पंतप्रधान यांच्या प्रशंसेच्या वक्तव्याबाबत आम्ही शशी थरूर यांना स्पष्टीकरण मागणार आहोत, त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर पुढील कारावाईबाबत निर्णय घेतला जाईल. शिवाय, थरूर यांचे हे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे व आपण त्यांच्याशी याबाबत बोलणार असल्याचेही मुल्लापल्ली यांनी म्हटले आहे. याशिवाय मोदी सरकारच्या चुकांना दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही, असे केरळ विधानसभेतील विरोधीपक्ष नेते रमेश चेन्नितला यांनी म्हटलेले आहे.

मागील आठवड्यात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी, पंतप्रधान मोदींच्या कामांना नाकारणे आणि प्रत्येकवेळी त्यांना चुकीचे दर्शवल्याने काही उपयोग होणार नाही, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे शशी थरूर आणि त्यांचे सहकारी अभिषेक मनु सिंघवी यांनी समर्थन केले होते.