मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाकिस्तानात सध्या टोमॅटोचे वाढलेले दर पाहता मदतीसाठी हात पुढे केल्याचे दिसत आहे. मात्र, यासाठी त्यांनी ‘पीओके’ला सोडण्यास सांगितले आहे. झाबुआमधील शेतकऱ्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तसा संदेश पाठवला आहे. यात म्हटले आहे की, आपल्या कृत्यांबद्दल माफी मागून त्यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) सोडले, तर येथील शेतकरी त्यांना टोमॅटो पाठवण्यास तयार आहेत.

पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून टोमॅटोची ४०० ते ५०० रुपये किलो एवढ्या दराने विक्री होत आहे. ही माहिती झाबुआ जिल्ह्यातील पेटलवाद येथील शेतकऱ्यांना माध्यमांद्वारे समजली तेव्हा त्यांनी वाघा बॉर्डरद्वारे पाकिस्तानात टोमॅटो पाठवण्याची तयारी दर्शवली, मात्र यासाठी पाकिस्ताने पीओके सोडले पाहिजे अशी अट घातली आहे. भारतीय किसान यूनियनच्या झाबुआ येथील शाखेच्यावतीने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना २२ नोव्हेंबर यांना पत्र पाठवले आहे. पाकिस्तानने आमच्या देशातील निर्दोषांवर हल्ले केले. दहशतवाद पसरवला, मुंबईत हल्ला केला आणि नंतर पुलवामा येथील घटना देखील घडवली, असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

यूनियनच्या पत्रानुसार दहशतवादी कारवायांच्या निषेधार्थतच भारतीय किसान यूनियनने पाकिस्तानला टोमॅटो निर्यात करणे बंद केले होते. या अगोदर झाबुआमधील पेटलवाद येथील टोमॅटो मोठ्या प्रमाणावर वाघा बॉर्डरद्वारे पाकिस्तानमध्ये पाठवले जात होते. पत्रात हे देखील सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानने आपल्या कृत्याबद्दल माफी मागावी आणि पीओकेवरील ताबा काढून दाऊद इब्राहीम आणि अन्य दहशतवाद्यांना भारताकडे सोपवावे, तर भारतीय किसान यूनियन पाकिस्तानला टोमॅटो पाठवणे सुरू करेल.

पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर असणाऱ्या कराचीमधील बाजारपेठांमध्ये टोमॅटोच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली. एक किलो टोमॅटोची किंमत चक्क ४०० रुपये इतकी आहे. पाकिस्तानने शेतमालाच्या आयातीवर बंदी घातल्याने ही दरवाढ झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. काश्मीरमधील कलम ३७० कलम हटवल्यापासून पाकिस्तानने भारतामधून आयात होणाऱ्या शेतमालावर बंदी घातली आहे. तेव्हापासूनच तेथील टोमॅटोच्या किंमतींमध्ये भरमसाठ वाढ होताना दिसत आहे.
‘डॉन न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान सरकारने इराणमधून ४ हजार ५०० टन टोमॅटो आयात करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र याचा बाजारातील टोमॅटोचा तुटवडा दूर होण्यासाठी उपयोग झाला नाही आणि टोमॅटोच्या किंमतीचा आलेख चढताच आहे.