पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापत असल्याचं दिसत आहे. अगोदरच भाजपा विरोधात लढत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरोधात डाव्या आघाडीने काँग्रेसला सोबत घेत दंड थोपटल्यानंतर, काहीशा एकाकी पडलेल्या ममता यांच्या मदतीला आता अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी धावून आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना पाठिंबा देणार असल्याची घोषणा आज समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली. तसेच, यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा देखील साधला. “भाजपा बंगालमध्ये द्वेष निर्माण करून निवडणूक जिंकू इच्छित आहे. या अगोदर २०१७ मध्ये देखील भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये द्वेषाचे राजकारण करून निवडणुकीत विजय मिळवला, मात्र आता असं होणार नाही.” असं अखिलेश यादव म्हणाले आहेत.

 

ममतांनी थोपटले दंड! सुवेंदू अधिकारी यांच्या गडातून लढणार निवडणूक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक हळूहळू जवळ येऊ लागली असून, बंगालमधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राजकीय नेत्यांची पळापळवी सुरू असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे वर्तुळातील सुवेंदू अधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या राजकीय गडात शक्ती प्रदर्शन करत नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

भाजपाच्या रोड शोदरम्यान तुफान दगडफेक; पश्चिम बंगालमध्ये तणाव

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या रोड शोदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम येथील रॅलीनंतर काही वेळातच हा हिंसाचार झाला. भाजपाच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. सोबतच जवळ असणाऱ्या इमारतींच्या गच्चीवरुन बाटल्याही फेकण्यात आल्या. यावेळी काही जणांच्या हातात तृणमूल काँग्रेसचा झेंडा होता आणि ‘गो बॅक’च्या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.