शनिवारी बी. एस. येडियुरप्पा फ्लोअर टेस्टला सामोरे जाणार आहेत. मात्र ही फ्लोअर टेस्ट आम्ही निश्चितपणे जिंकू आणि आमचेच सरकार कायम राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमची बैठक शांगरिला हॉटेलमध्ये पार पडली. आमच्याकडे बहुमताचा आकडा अपेक्षेपेक्षा जास्त आहे. भाजपाचे कार्यकर्ते खूप आनंदात आहेत. १०१ टक्के आम्हीच फ्लोअर टेस्ट जिंकणार आहोत असे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ‘एएनआय’कडे म्हटले आहे. काँग्रेस, जेडीएसचे आमदार संपर्कात आहेत का? असे विचारले असता त्यांनी, होय अर्थातच काँग्रेस आणि जेडिएसचे काही आमदार आमच्या सोबत येत आहेत त्याचमुळे आम्ही फ्लोअर टेस्ट जिंकणार आहोत आणि सरकार आमचेच राहणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. १०१ टक्के आमचाच विजय होणार असे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभेत शनिवारी संध्याकाळी चार वाजता बहुमत सिद्ध करावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने  सत्ताधारी भाजपाला दिले आहेत.  बहुमत चाचणी सोमवारी घ्यावी, ही भाजपाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्रिशंकू विधानसभा असलेल्या कर्नाटकात राज्यपाल वजूभाई वाला यांनी बुधवारी रात्री भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली. भाजपाच्या वतीने अॅड. मुकुल रोहतगी, काँग्रेसच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी, केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, जनता दल सेक्यूलरच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.