पंजाबमध्ये शस्त्रे आणि संचार उपकरणे पोहोचवण्यासाठी पाकिस्तान ड्रोनचा वापर करत असल्याचे पंजाब पोलिसांच्या तपासात आढळल्यानंतर, हा प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रविवारी भारतीय हवाई दल आणि सीमा सुरक्षा दलाला केले.

पाकिस्तान शासन, आयएसआय, पाकपुरस्कृत जिहादी आणि पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या खलिस्तानवादी दहशतवादी संघटना यांनी अलीकडेच भारत-पाक सीमेपलीकडे पाठवलेल्या ड्रोनद्वारे शस्त्रे पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे, असे पोलीस उपमहासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले.

पाकिस्तान आणि जर्मनीतील एक दहशतवादी गट यांचा पाठिंबा असलेले पुनरुज्जीवित खलिस्तान जिंदाबाद फोर्सचे एक मॉडय़ूल राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतर हा प्रकार उघडकीला आल्याचे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे. हे दहशतवादी पंजाब व लगतच्या राज्यांत हल्ल्याचा कट आखत होते. पोलिसांनी ५ एके-४७ रायफलींसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.