भारतात लोकशाही पद्धतीने कारभार चालत असला तरी काही गावखेडयात अजूनही लोकशाही मुल्ये पूर्णपणे रुजलेली नाहीत. तिथे मनमानी, हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतले जातात. आंध्रप्रदेशच्या एका गावातील असेच मनमानी कारभाराचे एक प्रकरण समोर आले आहे. आंध्रच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका गावात महिला नाइटी पोषाख परिधान करु शकत नाहीत. या गावात दिवसा नाइटी घालण्यावर महिलांना बंदी आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

गावातील ज्येष्ठांनी हा आदेश दिला आहे. नाइटी वस्त्र फक्त रात्री घालण्यासाठीच असते असे त्यांचे मत आहे. आंध्रच्या टोकालापाल्ली गावातील नऊ सदस्यीय समितीने हा आदेश दिलाय. गावात एकूण १८०० महिला आहेत. सकाळी सात ते संध्याकाळी सात दरम्यान कुठल्याही महिलेने नाइटी घातली तर दोन हजार रुपये दंड ठोठावला जातो. कुठली महिला आदेशाचे उल्लंघन करत असेल तर त्याची माहिती देणाऱ्यास १ हजार रुपये दिले जातात.

खरंतर नऊ महिन्यांपासून टोकालापल्ली गावात या आदेशाची अंमलबजावणी सुरु आहे. पण गुरुवारी महसूल विभागाचे अधिकारी या गावात चौकशी करत असताना या आदेशाबद्दल समजले. नियम मोडणाऱ्या महिलेने दंड भरला नाही तर सामाजिक बहिष्कार घालण्याची धमकी देण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सरकारी अधिकाऱ्यांना काही सांगू नका अशी समजही या गावकऱ्यांना देण्यात आली होती. नाइटीवर कपडे धुणे, किराणा मालाच्या दुकानात जाणे, सभांना उपस्थित रहाणे चांगले दिसत नाही असे टोकालापाल्ली गावच्या सरपंचांनी सांगितले.