लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात आझाद हिंद सेनेची टोपी परिधान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी निशाणा साधला. आझाद हिंद सेनेची टोपी घातल्याने कोणीही नेताजी ठरत नाही, असे खोचक ट्विट करत त्यांनी मोदींना चिमटा काढला आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारच्या घोषणेच्या पंचाहत्तरीनिमित्त रविवारी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोदींनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला. बोस यांच्या निकटच्या सहकाऱ्याने दिलेली आझाद हिंद सेनेची टोपी मोदी यांनी परिधान केली होती. या पार्श्वभूमीवर शोभा डे यांनी ट्विटरवरुन मोदींना चिमटा काढला. ‘महान नेत्याची ओळख असलेली टोपी परिधान करुन कोणीही नेताजी ठरत नाही’, असे ट्विट त्यांनी केले.

शोभा डे यांच्या ट्विटवनंतर नेटीझन्सनी त्यांच्यावर टीका केली. गांधीजींची टोपी परिधान करुन गांधी होता येते का?, नेहरुंचं जॅकेट परिधान करुन नेहरु होता येते का?, शोभा डे या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, अशी टीका काही युजर्सनी केली. शोभा डे यांनी यापूर्वीही मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली होती.

दरम्यान, मोदी या कार्यक्रमात भारतविरोधी कारवाया करणाऱ्या राष्ट्रांना इशाराही दिला. भारताने कधीही कुणाच्या भूभागावर डोळा ठेवला नाही. मात्र, देशाच्या सार्वभौमत्वाला कुणी आव्हान दिल्यास त्यास दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर देऊ. भारत आपल्या लष्करी दलांचा वापर स्वसंरक्षणासाठीच करेल, आक्रमणासाठी नाही, असे त्यांनी सांगितले.