आज निर्णय

कार्बन डायॉक्साइड व हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून पृथ्वीची तपमानवाढ रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा हवामान बदल करार शनिवारी होण्याची शक्यता आहे. एकूण १९५ देशांचे प्रतिनिधी या करारासाठी पॅरिसमध्ये उपस्थित आहेत. खरेतर शुक्रवारीच हा करार होणे अपेक्षित होते पण अखेपर्यंत सहमती होत नसल्याने शेवटी वसुंधरेचे भवितव्य शनिवापर्यंत टांगणीला लागले आहे. फ्रान्सच्या अध्यक्षीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी हा सुधारित करार मांडला जाईल व दुपापर्यंत तो मंजूर होणे अपेक्षित आहे. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेंट फॅबियस हे चर्चेच्या अध्यक्षस्थानी असून त्यांनी सांगितले, की चर्चा योग्य दिशेने चालू आहे.
नवीन मसुदा जाहीर
हवामान कराराचा या आधी ४८ पानांचा असलेला मसुदा नंतर २९ पानांचा व आता २७ पानांचा करण्यात आला असून तो सुटसुटीत आहे. त्यात भारताने उपस्थित केलेला शाश्वत जीवनशैलीचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. हवामान करारावर अंतिम टप्प्यात जोरदार चर्चा झाली.
सत्तावीस पानांचा मसुदा मंत्रिपातळीवरील दोन दिवसांच्या चर्चेनंतर जाहीर करण्यात आला, यात काही मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री फॅबिअस यांनी मसुदा सादर केला असून त्यात भारताने मांडलेले काही मुद्दे समाविष्ट केले आहेत. शाश्वत जीवनशैली तसेच सामायिक पण वेगवेगळ्या प्रमाणातील कार्बन उत्सर्जन कपात जबाबदारी हे मुद्दे भारताने मांडले होते. अंतिम टप्प्यात हा करार मंजूर होण्याची शक्यता आहे व ते एक निर्णायक पाऊल राहील असे सांगत फॅबियस यांनी नवा मसुदा मांडला. नवीन मसुद्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.