उद्योग- व्यवसाय दिवसआड सुरू

बांगलादेश सरकारने कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोमवारपासून  सात दिवसांची टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.  रस्ते वाहतूकमंत्री ओबैदुल कादेर यांनी याबाबतची घोषणा करताना सांगितले की, देशात कोविड रुग्णाची संख्या वाढत आहे. बांगलादेशमध्ये शुक्रवारी ६८३० रुग्ण आढळून होते. त्यामुळे रुग्णांची संख्या ६,२४,५९४ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत मृतांची संख्या पन्नासने वाढली असून एकूण संख्या आता ९१५५ झाली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सात दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असून देशात कोविड बळींची संख्या वाढत असल्याचे सत्ताधारी अवामी लीगचे सरचिटणीस कादर यांनी म्हटले आहे. टाळेबंदीचा नियम हा अत्यावश्यक सेवांना लागू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कारखाने सुरू राहणार असून आरोग्य नियम पाळून कामगार काम करू शकणार आहेत. देशातील प्रत्येक कार्यालये व न्यायालये टाळेबंदी काळात बंद राहणार असून उद्योग व इतर व्यवसाय एक दिवसआड काम करतील, असे सामान्य प्रशासन राज्य मंत्री फरहद होसेन यांनी सांगितले. उद्योग का बंद केले जाणार नाहीत, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, कारखाने व कापड गिरण्या वेगवेगळ्या वेळात चालू राहतील. जर कापड गिरण्या बंद केल्या तर कामगारांना त्यांच्या गावी जावे लागेल. त्यातून संसर्ग आणखी वाढेल.  बांगलादेशात बुधवारी करोना रुग्णांची संख्या ५,३५८ ने वाढली असून ती गेल्यावर्षीच्या मार्चपासून आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

सोमवारी पंतप्रधानांनी अठरा कलमी योजना जाहीर करून सार्वजनिक पातळीवर एकत्र येण्यावर बंदी घातली होती. कारण संसर्ग वाढला होता. लोकांनी जास्त मोठय़ा संख्येने एकत्र येऊ नये, सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होता कामा नये असे नियम घालून देण्यात आले आहेत. बसगाडय़ांमध्येही क्षमतेच्या निम्मे प्रवासी घेण्यास सांगण्यात आले आहे.

भारतात सहा महिन्यांतील सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ

नवी दिल्ली : भारतात  शनिवारी ८९ हजार १२९ करोना रुग्णांची नोंद  झाली असून गेल्या साडेसहा महिन्यांतील एकाच दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे देशात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता १.२३ कोटी झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मृतांची संख्या १ लाख ६४ हजार ११० झाली असून दिवसभरात ७१४ बळी गेले आहेत. बळींची संख्या ऑक्टोबर २०२० नंतर प्रथमच वाढली आहे.

शनिवारी रुग्णांची संख्या गेल्या वर्षी २० सप्टेंबरला होती तेव्हापासूनच्या काळात सर्वाधिक झाली असून २४ तासात ९२ हजार ६०९ जणांना संसर्ग झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून ती एकूण रुग्ण संख्येच्या ५.३२ टक्के म्हणजे ६ लाख ५८ हजार ९०९ झाली आहे. हा दर ५.३२ टक्के आहे. उपचारामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण घटून ९३.३६ टक्के झाले आहे. १२ फेब्रुवारीला उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १ लाख ३५ हजार ९२६ झाले आहे. हे प्रमाण एकूण संसर्गाच्या १.२५ टक्के झाले  आहे. रोगातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ कोटी १५ लाख ६९ हजार २४१ झाली आहे. मृत्यू दर १.३४ टक्कय़ांपर्यंत खाली घसरला आहे.

दैनंदिन करोना रुग्णांची संख्या गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १७ व्या दिवशी  ९७  हजार ८९४ होती. त्यानंतर करोनाचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली होती. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या माहितीनुसार २ एप्रिलपर्यंत २४ कोटी ६९ लाख ५९ हजार १९२ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या असून शुक्रवारी १० लाख ४६ हजार ६०५ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. महाराष्ट्रात ४८१, पंजाब ५७, छत्तीसगड ४३, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश प्रत्येकी १६, केरळ व दिल्ली प्रत्येकी १४, तमिळनाडू १२, गुजरात व हरयाणा ११ याप्रमाणे एकूण ७१४ बळी चोवीस तासात गेले आहेत. आतापर्यंत १ लाख ६४ हजार ११० बळी गेले असून महाराष्ट्रात ५३ हजार ३७९, तमिळनाडूत १२ हजार ७५०, कर्नाटकात १२५९१, दिल्लीत ११०५०, पश्चिम बंगाल १०३३५, उत्तर प्रदेश ८८३६, आंध्र प्रदेश ७२२५, पंजाब ६९८३ बळी गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सत्तर टक्के बळी हे सह आजाराच्या व्यक्तींचे आहेत.