सर्वोच्च न्यायालयाचा झारखंड सरकारला आदेश 

झारखंडमधील धनबाद येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या कथित हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने झारखंड सरकारला एका आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतङ्महून दखल घेतली आहे. न्यायाधीशांच्या हत्या प्रकरणाबाबत आतापर्यंत काय तपास करण्यात आला आहे अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने झारखंडचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना आठवड्याच्या आत तपासाबाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या झारखंड उच्च न्यायालयातच या प्रकरणाची सुनावणी सुरू राहील असेही सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले.

खंडपीठाने म्हटले आहे की, देशभरात न्यायाधीश आणि वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांचा विचार केल्यावर या प्रकरणाची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याने या प्रकरणाची स्वत: दखल घेणे योग्य वाटले.

पुढील आठवड्यात होणाऱ्या या प्रकरणाच्या सुनावणीस झारखंडच्या महाधिवक्त्यांना उपस्थित राहण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून त्यानंतर इतर राज्यांना नोटिसा बजावण्याच्या मुद्द्यावर विचार केला जाईल.