वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठकीला हजर राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी येथे आगमन झाले असून, या परिषदेत ते भारत हा गुंतवणुकीसाठी पोषक आणि उद्योगस्नेही देश आहे याचे महत्त्व उपस्थितांना पटवून देणार आहेत.

गेल्या दोन दशकांत भारतीय पंतप्रधान या परिषदेला हजर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. जवळपास १०० हून अधिक देशांचे आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रातील नेते या वेळी मोदी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मोदी यांचे मंगळवारी फोरममध्ये भाषण होणार असून ते स्वित्र्झलडचे अध्यक्ष आणि स्वीडनचे पंतप्रधान यांच्याशीही परस्परसंबंधांबाबत चर्चा करणार आहेत.

मोदी यांचे येथे आगमन झालेले असतानाच दावोसमध्ये बर्फवृष्टी झाली असून हिमकडे कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर पडलेले बर्फ दूर करून मार्ग मोकळा करण्याची कामगारांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. जागतिक पातळीवर अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गुंतवणूकदार सरकार कोणत्या सुधारणांचे संकेत देत आहे त्याकडे लक्ष ठेवून आहेत, असे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आपल्या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय समुदायासमवेत आपण भारताच्या भविष्यातील कार्यक्रमांबाबत चर्चा करणार असल्याचे मोदी यांनी सोमवारी रात्री जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत भारताने बाहेरच्या जगाशी जे संबंध स्थापन केले आहेत ते राजकीय, आर्थिक, जनताभिमुख, सुरक्षा आणि अन्य घटकांचा समावेश असलेले आणि परिणामकारक ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

‘इंडिया मिन्स बिझनेस’ या हॅशटॅगखाली मोदी यांनी ट्वीटही केले असून दावोसमध्ये आपण भारताच्या भवितव्याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायासमवेत चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. मोदी यांच्यासह वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान व वरिष्ठ सरकारी अधिकारीही जागतिक गुंतवणूकदारांशी चर्चा करणार आहेत.

विकासदर ७.४ टक्के; नाणेनिधीचा अंदाज

देशाची यशोगाथा मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोस येथे गेले असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने खूशखबर दिली आहे! या वर्षी म्हणजे सन २०१८-१९ मध्ये भारताचा विकासदर ७.४ टक्के राहील, असे भाकीत या वित्तीय संस्थेने केले असून त्या तुलनेत चीनच्या अर्थव्यवस्थेची गती ६.८ टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोटाबंदी आणि वस्तू व सेवा करप्रणालीची अंमलबजावणी या दोन प्रमुख कारणांमुळे विकासदर तुलनेत कमी होऊन ६.७ टक्क्यांवर आला होता. २०१९-२० मध्ये विकासाचा वेग ७.८ टक्क्यांच्या आसपास राहील.