अनेक तासांपासून तुमच्या मोबाइलला नेटवर्क मिळत नसते आणि अचानक तुमच्या मोबाइल फोनवर ‘वेलकम टू चायना’ असा संदेश येतो. छोटयाशा, खडबडीत रस्त्यावरुन तुम्ही पुढे जाता तेव्हा मॅनडारीन भाषेतील शब्द तुमच्या मोबाइल फोनवर दिसतात. बऱ्याच वेळापासून कुठलाही सिग्नल नसलेला तुमचा मोबाइल फोन नेटवर्क रेंजमध्ये आलेला असतो. त्यावर बिजींगची वेळ दिसू लागते. बिजींग भारतापेक्षा दोन ते अडीच तास पुढे आहे. थोडे अजून पुढे गेल्यानंतर तुम्हाला चिनी लष्कराची तातू मिलिट्री कॉम्पलेक्स ही तीन मजली इमारत दिसते. गुळगळीत, रुंद अशा रस्त्यावरुन तुम्ही या इमारतीपर्यंत पोहोचू शकता. हे संपूर्ण चित्र अरुणाचल प्रदेशमधल्या चीनला लागून असणाऱ्या सीमेवरचे आहे.

भारताला अजूनही अरुणाचल प्रदेशमध्ये चीनला लागून असणाऱ्या सीमेपर्यंत पक्के रस्ते बांधता आलेले नाहीत. पण त्याचवेळी चीनने सीमेपर्यंत पायाभूत सोयी-सुविधांचे जाळे उभे केले आहे. आपल्याकडे दुर्गम भागात अजूनही रस्ते आणि मोबाइलचे नेटवर्क पोहोचू शकलेले नाही. एखाद्या जखमी सैनिकाला उपचारांसाठी दुसऱ्या ठिकाणी हलवणे एक आव्हान असते. तेझूवरुन किबीथूपर्यंत येणारा एकमेव रस्ता अनेकदा दरड कोसळण्याच्या घटनांमुळे बंद असतो असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

युद्धाच्या प्रसंगात रस्त्यांचे नेटवर्क नसेल तर सैन्य तुकडया किंवा साहित्य योग्यवेळेत, योग्य ठिकाणी पोहोचवता येणार नाही. युद्ध साहित्य किंवा मनुष्यबळ आमची समस्या नसून रस्ते, पूल या पायाभूत सुविधांची कमतरता हे आमच्यासमोरचे मुख्य आव्हान आहे असे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. तुम्ही भारताच्या हद्दीत असताना तिथे भारतीय कंपन्यांऐवजी चिनी मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क येते.

दरम्यान डोकलामसारखा संघर्ष पुन्हा घडू नये यासाठी भारताने अरुणाचल प्रदेशमधील चीनला लागून असणाऱ्या तिबेट भागातील सीमेवर अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत. त्याचप्रमाणे दिबांग, दाऊ-दिलाई आणि लोहित खोऱ्यातील डोंगराळ भागात गस्तही वाढवली आहे. चीनची भूप्रदेशाची भूक आणि वाढत्या महत्वकांक्षा लक्षात घेऊन भारताकडून खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत.