जगभरात नववर्षांचे स्वागत श्ॉम्पेनच्या बाटल्या फोडून करण्यात आले पण युरोपमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीमुळे कडक सुरक्षा होती, त्यामुळे लोकांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले. नववर्षदिनी जर्मनीत दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने तेथे अनेक रेल्वे स्टेशन्स रिकामी करण्यात आली. दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर पॅरिस व ब्रसेल्स येथे आतषबाजीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. असे असले तरी पॅरिसमध्ये लोकांनी एकत्र जमून आम्ही दहशतवादी हल्ल्यांना घाबरलेलो नाही असे दाखवून दिले.
न्यूयॉर्कमध्ये किमान सहा हजार पोलिस तैनात करण्यात आले होते व टाइम्स स्क्वेअर येथे महापौर बिल ब्लासियो यांनी एक बटन दाबून चमचमचा काचेचा चेंडू २०१५ च्या अखेरच्या क्षणी सोडला. जगभरात अनेक ठिकाणी लोकांमध्ये उत्साह होता पण कॅलिफोर्निया व पॅरिसमधील हल्ल्यांनी न्यूयॉर्कमध्ये कडक सुरक्षा ठेवली होती. न्यूयॉर्कच्या इतिहासात इतकी सुरक्षा कधीच ठेवण्यात आली नाही, हे यंदाचे विशेष होते.
जर्मनीत नवीन वर्षांचा जल्लोष सुरू होण्याच्या आधीच म्युनिक येथे दहशतवादी हल्ल्यांच्या इशाऱ्याने दोन रेल्वे स्थानके रिकामी करण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत आयसिसचा हल्ला होण्याची पक्की माहिती मिळाली होती. पोलिसांनी सांगितले, की मैत्रीपूर्ण गुप्तचर संस्थेने या हल्ल्याची माहिती दिली होती त्यामुळे आता पाच ते सात संशयितांचा शोध जारी आहे.
फ्रान्समध्ये नववर्षदिनी १ लाख पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. १३ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच पॅरिसमध्ये चॅम्पस एलिसीस येथे हजारो लोक नववर्षांच्या स्वागताला जमले होते.पण दरवर्षीप्रमाणे यंदा आतषबाजी झाली नाही. बेल्जियममध्ये नववर्ष दिनी हल्ला करण्याचा कट केल्याच्या आरोपावरून ब्रसेल्स येथे पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पॅरिस हल्ल्यातील चौथा संशयित पकडल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.
दुबईत ६३ मजली हॉटेलला आग लागली. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बूर्ज खलिफानजीक हा प्रकार घडला. आगीत १६ जण जखमी झाले असले, तरी नववर्षांचे स्वागत जल्लोषात झाले. बूर्ज खलिफा येथून आतषबाजी करण्यात आली त्यामुळे लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. सिडनीत पारंपरिक पद्धतीने नववर्षांचे स्वागत करताना मध्यरात्रीच्या ठोक्याला आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.
सिडनी येथे नववर्ष पहिल्यांदा सुरू होते तेथे जल्लोषात स्वागत झाले, हजारो लोक नदीकिनारी जमले होते. बीजिंग, सिंगापूर येथेही उत्साह होता. तुर्कस्थानमध्ये नववर्षदिनी हल्ल्याचा कट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ब्रुनेईत ख्रिसमसवर बंदीच होती त्यामुळे उत्साह दाखवण्याचा प्रश्नच नव्हता.