18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

आइनस्टाइन प्रज्ञावान का होता?

अनेक लोकांना लाभलेला नसतो असा असामान्य ‘प्रमस्तिष्क बाह्य़क’ हा भाग प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन

पीटीआय, वॉशिंग्टन | Updated: November 17, 2012 5:29 AM

अनेक लोकांना लाभलेला नसतो असा असामान्य ‘प्रमस्तिष्क बाह्य़क’ हा भाग प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांना लाभलेला होता. त्यामुळे ते इतरांपेक्षा प्रज्ञावान होते असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे.
फ्लोरिडा विद्यापीठातील उत्क्रांती मानववंशशास्त्रज्ञ डीन फॉक यांच्या नेतृत्वाखाली आइनस्टाइनच्या मेंदूचा जो अभ्यास करण्यात आला त्यात असे दिसून आले की, आइनस्टाइन यांचा मेंदू सामान्य लोकांपेक्षा वेगळा होता व त्यांच्या आकलनक्षमता खूपच जास्त होत्या.
आइनस्टाइनच्या मेंदूची अलीकडे सापडलेली १४ छायाचित्रे पाहून फॉक व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निष्कर्ष काढला असून आइनस्टाइनच्या मेंदूतील ‘प्रमस्तिष्क बाह्य़क’ हा भाग नेमका कसा होता याचे वर्णन वैज्ञानिकांनी प्रथमच केले आहे. वैज्ञानिकांनी आइनस्टाइनच्या मेंदूतील रचनेची तुलना ही ८५ सामान्य लोकांच्या मेंदूरचनेशी केली; त्यात त्यांना असे दिसून आले की, आइनस्टाइनचा मेंदू वेगळाच होता. कार्यात्मक प्रतिमा संशोधन पद्धतीने हे संशोधन करण्यात आले. आइनस्टाइनच्या मेंदूचा सर्वसाधारण आकार व असममिताकार हा इतरांप्रमाणेच होता, पण प्रमस्तिष्क बाह्य़क, संवेदी बाह्यक,  प्राथमिक कारक, पश्चमस्तिष्क हे सगळे भाग वेगळे आहेत. हे संशोधन ‘ब्रेन’ नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
आइनस्टाइन यांचा मृत्यू १९५५ मध्ये झाला. त्यानंतर त्यांचा मेंदू काढून घेण्यात आला व त्यांच्या मेंदूची विविध कोनातून छायाचित्रे घेण्यात आली. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती. त्याच्या मेंदूचे एकूण २४० भाग करून त्याच्या शरीरशास्त्रीय स्लाइड तयार करण्यात आल्या आहेत. गेल्या ५५ वर्षांत यातल्या अनेक स्लाइडस, छायाचित्रे व भाग लोकांच्या दृष्टिआड झाले. आताच्या संशोधनासाठी जी चौदा छायाचित्रे वापरली आहेत ती नॅशनल म्युझियम ऑफ हेल्थ अँड मेडिसिन या संस्थेकडे होती. आइनस्टाइन यांचा मेंदू १९५५ मध्ये डॉ. थॉमस हार्वे यांनी काढून घेतला व त्याचा अभ्यास केला होता.

First Published on November 17, 2012 5:29 am

Web Title: were einstein was intellectual or not