काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांची नावं मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांची निवड करण्यात यावी, असं मागणी करणारं पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये दोघेही होते. आझाद आणि सिब्बल यांच्यावर पक्षातून टीका झाल्याचं समोर आलं होतं. या टीकेचा हवाला देत या दोन्ही नेत्यांना काँग्रेस सोडून भाजपात येण्याची ऑफर देण्यात आली आहे. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ही ऑफर दिली आहे.

काँग्रेसमधील पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या पत्रावर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांच्याही स्वाक्षऱ्या होत्या. या पत्रानंतर झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत दोन्ही नेत्यांवर टीका झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, नंतर त्यावर पक्षाकडून आणि दोन्ही नेत्यांकडून पडदा टाकण्यात आला.

या पक्षातंर्गत वादानंतर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांना रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. “काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांनी प्रचंड मेहनत घेतली. जर राहुल गांधीजी त्यांच्यावर आरोप करत असतील, तर त्यांनी पक्ष सोडायला हवा. आम्ही भाजपामध्ये त्यांचं स्वागत करण्यास तयार आहोत,” अशी ऑफर आठवले यांनी दिली आहे.

काय म्हटलं होतं पत्रात?

काँग्रेस पक्षामध्ये बदल करण्याची मागणी करणारं हे पत्र १५ दिवसांपूर्वी देण्यात आलं होतं. या पत्रामध्ये या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. “पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ प्रभावी व लोकांमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी. पक्षामध्ये व्यापक स्वरूपात सुधारणा करण्याबरोबरच, सत्तेचं विकेंद्रीकरण, राज्यांमधील पक्ष बळकटीकरण, प्रत्येक स्तरावर पक्षातंर्गत निवडणूका, केंद्रीय कार्यकारणीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत निवडणुका आणि पक्षाच्या संसदीय मंडळासाठी तात्काळ घटना तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाच्या होत असलेल्या घसरणीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पक्षांनं प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केलं नाही,” असं या नेत्यांनी म्हटलं होतं.