मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील स्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट आहे, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीकास्त्र सोडले आहे. तसेच केंद्राने प्रस्तावित केलेल्या भूसंपादन सुधारणा अध्यादेशातील तरतुदी पश्चिम बंगाल लागू करणार नाही, असे सांगत त्यांनी केंद्राला आव्हान दिले.
याबाबत केंद्राच्या अध्यादेशाचे वर्णन त्यांनी काळा अध्यादेश अशा शब्दांत केले. बंदुकीच्या जोरावर आता जमीन हडप करण्याचा परवानाच मिळाला आहे, असा आरोप ममतांनी केला. बंगालमध्ये आम्ही हे होऊ देणार नाही. माझ्या मृतदेहावरूनच त्यांना जमीन मिळवावी लागेल, असे स्पष्ट करत मोदी सरकारविरोधात दोन हात करण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. मोदी सरकारच्या काळात आणीबाणीपेक्षाही भीषण परिस्थिती असल्याचा आरोप त्यांनी येथील जाहीर सभेत केला. या अध्यादेशाच्या प्रतीकात्मक प्रती जाळून आम्ही निषेध व्यक्त करू, असे ममतांनी स्पष्ट केले.