पश्चिम बंगालमधील राजकारणात दबदबा असलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आमदारकी पाठोपाठ पक्षाच्या सर्व पदांसह सदस्यांचा राजीनामा दिला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र, आतापासूनच राजकीय हादरे जाणवू लागले आहेत. बंगालच्या राजकारणात वजनदार समजले जाणारे तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज आमदारकीपाठोपाठ पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानं बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीपासूनच सुवेंदू अधिकारी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्रिपदापाठोपाठ अधिकारी यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर आज (१७ डिसेंबर) सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्व पदांसह सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

ममता बॅनर्जी यांच्याकडे अधिकारी यांनी राजीनामा सुपूर्द केला. तृणमूलचा राजीनामा दिल्यामुळे ते भाजपा जाणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुढील काही दिवसात अधिकारी भाजपात दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

सुवेंदू अधिकार यांच्याबरोबर तृणमूलचा आणखी एक नेता पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तृणमूलचे नेते जितेंद्र तिवारी यांनी असनोल महापालिकेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिली आहे. त्यामुळे तिवारी हे सुद्धा तृणमूल सोडण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.