हिंसाचाराच्या तुरळक घटना

पीटीआय,  कोलकाता / सॉल्ट लेक/ वर्धमान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात काही ठिकाणी हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्याचे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर २४ परगणा, पूर्व वर्धमान, नदिया, जलपैगुडी, दार्जिलिंग आणि कालिम्पाँग जिल्ह्यातील ४५ मतदारसंघांत शनिवारी मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ७८.३६ टक्के मतदान झाले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सहा जिल्ह्यांतील ४५ विधानसभा मतदारसंघांसाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत किमान ७८.३६ टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी आरिझ आफताब यांनी दिली.

सर्वात जास्त ८१.७३ टक्के मतदान जलपैगुडी जिल्ह्यात झाले. याखालोखाल पूर्व वर्धमान (८१.७२ टक्के), नदिया (८१.५७), उत्तर २४ परगणा (७४.८३), दार्जिलिंग (७४.३१) व कालिम्पाँग (६९.५६ टक्के) असे मतदान झाल्याची माहिती आफताब यांनी दिली.

बिधाननगरच्या शांतिनगर, तसेच उत्तर २४ परगण्यातील बिजपूर येथील हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता मतदान सर्वसाधारणपणे शांततेत झाले, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने केंद्रीय दलांच्या किमान ८५३ कंपन्या तैनात केल्या होत्या. प्रत्येक कंपनीत अधिकाऱ्यांसह सुमारे १०० कर्मचारी असतात.

मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा दलांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, काही तुरळक प्रकार घडले असले तरी सुरक्षा दलांनी त्यावर तोडगा काढला आणि स्थिती नियंत्रणात ठेवली, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.

बिधनगरमधील शांतीनगर येथे तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या समर्थकांमध्ये चकमक उडाली, मतदारांना मतदान केंद्रांवर जाऊ दिले जात नसल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी एकमेकांवर केला. या वेळी झालेल्या दगडफेकीत आठ जण जखमी झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सिलीगुडीमध्ये तृणमूल आणि माकपच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राबाहेरच चकमक उडाली, तर नादिया जिल्ह्यात केंद्रीय दलांनी मतदारांना माघारी फिरण्यास सांगितल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. त्याचप्रमाणे वर्धमान उत्तर येथील एका मतदान केंद्राचा भाजपने ताबा घेतल्याचा आरोपही तृणमूलने केला.

उत्तर २४ परगणामध्ये भाजपच्या काही मतदान केंद्र प्रतिनिधींचे तृणमूल काँग्रेसने अपहरण केल्याचा आरोप भाजपने केला. काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 जंगीपूर : निवडणूक लांबणीवर

पश्चिम बंगालमधील जंगीपूर मतदारसंघातील डाव्या आघाडीच्या उमेदवाराचे निधन झाल्याने निवडणूक आयोगाने शनिवारी तेथील निवडणूक पुढे ढकलली. रिव्हॉल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे (आरएसपी) उमेदवार प्रदीप कुमार नंदी यांची करोना चाचणी ४ दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. बºहमपूरमधील एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी त्यांचे निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

देगंगा :  गोळीबाराबाबत अहवाल

दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील देगंगा मतदारसंघात मतदान सुरू असताना केंद्रीय दलांनी कथितरित्या गोळीबार केल्याचा आरोप स्थानिकांनी केल्यानंतर निवडणूक आयोगाने शनिवारी या घटनेबाबत निवडणूक निरीक्षकांकडून अहवाल मागवला आहे.

ह्यमुख्य निवडणूक अधिकारी आरिझ आफताब यांना काही ध्वनिचित्रफिती मिळाल्या असून, केंद्रीय दलांनी देगंगाच्या कुरुलगाछा भागातील एका मतदान केंद्राजवळ गोळीबार केल्याचा आरोप गावकरी करत असल्याचे त्यात दिसत आहे. या प्रकरणी आम्ही निवडणूक निरीक्षकांकडून तातडीचा अहवाल मागवला आहेह्ण, अशी माहिती एका वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याने दिली.

तथापि, ज्या केंद्रावर गोळीबार झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला, तेथे तैनात असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) अधिकाऱ्याने हे आरोप निराधार असल्याचे सांगितले. येथे सर्व काही ठीक असून मतदान शांततेत सुरू आहे. या भागात कुठेही गोळीबाराची कुठलीही घटना घडलेली नाही, असे तो म्हणाला.

ममतांकडून मृतदेहांचेही राजकारण : मोदी

असनसोल : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांतच तृणमूल काँग्रेस पक्षाचे तुकडे झाले आहेत, आता राज्यातील निवडणूक प्रक्रियेच्या अखेरीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा अभिषेक पूर्णपणे नामोहरम झालेले असतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केला. ममता बॅनर्जी मृतदेहांचेही राजकारण करीत असल्याचा आरोपही मोदी यांनी या वेळी केला.

मृतदेहांवरून राजकारण करण्याची ममतांची जुनीच सवय आहे, कूचबिहारमधील सीतालकुची येथे झालेल्या गोळीबारात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यावरून ममता राजकारण करीत आहेत, असा आरोप मोदी यांनी असनसोल शहरातील एका जाहीर सभेत केला. पहिल्या चार टप्प्यांतील मतदानानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाचे तुकडे झाले आहेत आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दीदी आणि भतिजा नामोहरम झालेले असतील, असे मोदी म्हणाले.

पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील असनसोलच्या नजीक असलेल्या परिसरात कोळशाच्या बेकायदा खाणींची भरभराट झाली आहे आणि त्यामधून मिळालेले उत्पन्न कोठे जाते याची प्रत्येकाला जाणीव आहे, ममता किती असंवेदनक्षम आहेत ते त्यांच्या संभाषणाची एक फीत व्हायरल झाली त्यावरून स्पष्ट झाले आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यात होणाऱ्या बैठकीला हजर राहण्याचे ममता टाळतात, अलीकडेच देशातील करोनाच्या स्थितीसंदर्भात एक बैठक झाली त्यालाही त्या गैरहजर होत्या, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना आणि राज्यातील जनता यांच्यामध्ये ममता एखाद्या भिंतीप्रमाणे उभ्या राहतात, असे मोदी म्हणाले.

 

दूरध्वनी टॅप होत असल्याचा आरोप

गलसी : कूचबिहारमध्ये गोळीबारात मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सभेला संबोधित करीत असल्याची फीत व्हायरल झाल्यानंतर ममता यांनी आपले दूरध्वनी टॅप होत असल्याचा शनिवारी आरोप केला आणि या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश आपण देणार असल्याचे जाहीर केले.

विकासाच्या मुद्द्यावर भाजप तृणमूल काँग्रेसशी बरोबरी करू शकत नसल्याने भाजप कारस्थान करीत असल्याचा आरोप ममतांनी एका सभेत केला. त्यामुळे आता भाजप आमच्या दैनंदिन संभाषणांवरही पाळत ठेवत असून ते आमच्या स्वयंपाकघरापर्यंतही पोहोचले आहेत असे वाटते, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.

या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश आपण देणार आहोत, अशा प्रकारची पाळत ठेवण्यात जे सहभागी आहेत त्या कोणाचीही गय केली जाणार नाही. यामागे कोणाचा हात आहे त्याची आपल्याला जाणीव आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. काही हस्तकांच्या मदतीने केंद्रीय दले असले प्रकार करीत आहेत अशी आपल्याकडे माहिती असल्याचा दावाही ममतांनी केला. या प्रकारामध्ये आपला हात नसल्याचा दावा भाजप करीत असली तरी त्यांचाच त्यामागे हात आहे हे स्पष्ट आहे, असेही त्या म्हणाल्या.