पश्चिम बंगालमध्ये भाजपाला आणखी एक झटका बसला आहे. अलीपुरद्वारचे जिल्हाध्यक्ष गंगाप्रसाद शर्मा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज(सोमवार) दुपारी मुकुल रॉय यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी टीएमसीत प्रवेश केला. यावेळी गंगाप्रसाद शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील आणखी काही नेते देखील तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत.

जुन्या कार्यकर्त्यांना भाजपात योग्य स्थान नाही. निर्णय प्रक्रियेत मतभेद होत आहेत. दोन-तीन जणांनी तिकीट वाटप केले, त्यापैकी एक कैलाश विजयवर्गीय आहेत. पक्षाच्या पराभवासाठी व परिस्थितीसाठी तेच उत्तरदायी आहेत. त्यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा द्यायला हवा. असं गंगप्रसाद म्हणाले आहेत.

भाजपाचे दिग्गज नेते मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपाचे इतर आमदार आणि नेतेही रॉय यांच्या पावलावर पाऊल ठेवत तृणमूलमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुलगा शुभ्रांशू रॉय याच्यासह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी, ”मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजपामध्ये कुणीही राहू शकत नाही.” असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
तर, मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये भविष्यात महत्वाची भूमिका निभावतील, असं म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालची सत्ता तिसऱ्यांदा ममता बॅनर्जींच्या हाती आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच भाजपावासी झालेले पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेसचे नेते स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.