पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यांमधील लोकांना मोठ्या प्रमाणात घऱाबाहेर पडत मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. आसाममध्ये ४७ जागांसाठी मतदान सुरु झालं आहे. यावेळी मोदींनी खासकरुन तरुणांना आवाहन केलं आहे.

“आसासममध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी पात्र असणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं. खासकरुन माझ्या तरुण मित्रांना मतदान करण्याचं आवाहन मी करत आहे,” असं ट्विट नरेंद्र मोदींनी केलं आहे.

नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पश्चिम बंगालसाठीही ट्विट केलं आहे. “मतदानासाठी पात्र असणाऱ्यांनी रेकॉर्ड नंबरमध्ये मतदान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो,” असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

आज होणाऱ्या मतदानामध्ये पश्चिम बंगालमध्ये ३० विधानसभा मतदारसंघातील १९१ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तर आसामधील ४७ मतदारसंघातील २६४ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, विधानसभेचे अध्यक्ष हितेंद्रनाथ गोस्वामी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा आणि अनेक मंत्र्यांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये बहुसंख्य मतदारसंघ एके काळी नक्षलग्रस्त असलेल्या जंगल महाल क्षेत्रातील आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कडेकोट बंदोबस्त ठेवला असून केंद्रीय दलांच्या ६८४ कंपन्या १० हजार २८८ मतदान केंद्रांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मोक्याच्या ठिकाणांवर राज्यातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

कोविड-१९ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पुरुलियातील नऊ, बांकुरातील चार, झारग्राममधील चार आणि पश्चिम मेदिनीपूरमधील सहा आणि पूर्व मेदिनीपूरमधील सात जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी २९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. तर काँग्रेस-डावे-आयएसएफ आघाडीने ३० उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

तर आसाममध्ये ४७ मतदारसंघांपैकी बहुसंख्य मतदारसंघांत सत्तारूढ भाजप-एजीपी आघाडी, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांची महाआघाडी आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जातिया परिषद यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राज्यात तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. केंद्रीय दले राज्य पोलिसांना मदत करणार आहेत.