पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी २९१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे टीएमसीने २० आमदारांची नावं यादीमधून वगळली असून यामध्ये काही पार्थ चटोपाध्याय यांच्यासह काही मोठ्या नंत्यांचा समावेश आहे. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांनाही यादीतून वगळण्यात आलं आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ ठरला असून नंदीग्राम मतदारसंघातून त्या निवडणूक लढणार आहेत.

शिवसेनेची ‘ममतां’ना साथ! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतला मोठा निर्णय

ममता बॅनर्जी यांनी २९४ पैकी तीन जागा मित्रपक्षांसाठी उत्तर बंगाल आणि इतर ठिकाणच्या सोडल्या असल्याची माहिती दिली आहे. यादी जाहीर करताना ममता बॅनर्जी यांनी, यामध्ये एकूण ५० महिला उमेदवार, ४२ मुस्लिम उमेदवार, ७९ अनुसूचित जातीमधील उमेदवार आणि १७ अनुसूचित जमातीमधील उमेदवार असल्याची माहिती दिली आहे.

यादी जाहीर करतच ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला कडवी झुंज देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आठ टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहेत.

ममतांसाठी शिवसेनेची माघार-
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार की नाही? हे जाणून घेण्याबद्दल असंख्य लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर याठिकाणी माहिती देत आहे. पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बघितली तर असं दिसतंय की, दीदी विरुद्ध सर्व अशीच लढाई दिसत आहे. सर्व ‘एम’ म्हणजे मनी, मसल आणि मीडिया यांना ममता दीदीविरुद्ध वापरलं जात आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला आहे की, शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढणार नाही आणि ममतांना समर्थन असेल. आम्हाला आशा आहे की, ममता दीदींची डरकाळी पुन्हा एकदा यशस्वी होईल. कारण त्या खऱ्या बंगाली टायगर आहेत, यावर आमचा विश्वास आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिल्याबद्दल तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन आणि शिवसेना यांचे आभार मानले आहेत.