विधानसभा निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा पारा चढू लागला आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या यांच्यात थेट लढत बघायला मिळत असून, दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात प्रतिष्ठा पणाला लावली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बंगालमध्ये प्रचाराचं रणशिंग फुंकणार असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा करणार आहेत. त्यामुळे आज ममता विरुद्ध मोदी असा शाब्दिक युद्ध बघायला मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच पश्चिम बंगालमध्ये पाऊल ठेवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी कोलकाता आयोजित करण्यात आलेल्या सभेतून प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे. दुपारी १.२० वाजता कोलकातात दाखल होणार आहेत. त्यानंतर २ वाजता पंतप्रधानांची शहरातील ब्रिगेड परेड मैदानावर जाहीर प्रचारसभा होणार आहे. या मैदानावरील या सभेला प्रचंड गर्दी जमवण्यात येणार असून, सभा भूतो न भविष्यती अशीच असेल, भाजपा नेत्यानं पीटीआयशी बोलताना सांगितलं.

दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली सिलगुडी येथे पदयात्रा काढण्यात येणार आहे. पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या दरवाढीविरोधात ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत हजारो लोक सहभागी होणार असल्याचं ममतांनी यांनी म्हटलं आहे. दुपारी १ वाजता दार्जिलिंग येथे मोठ्या संख्येनं महिला पदयात्रेसाठी येणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या सभांकडे बंगालचं लक्ष्य लागलं आहे. पंतप्रधान मोदी आपल्या पहिल्याच प्रचारसभेतून कोणत्या मुद्द्यावरून ममतांना घेणार, याची चर्चा सध्या सुरू आहे.

मिथून चक्रवर्ती करणार भाजपात प्रवेश?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या प्रचारसभेच्या व्यासपीठावर अभिनेते मिथून चक्रवर्तीही दिसण्याची शक्यता आहे. मिथून चक्रवर्ती यांनी काल (६ मार्च) सायंकाळी बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतल्यानं ते भाजपात प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे मोदींच्या सभेनंतरच या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.