निवडणुका म्हणजे कोणत्याही राज्यासाठी मोठा राजकीय इव्हेंट असतो. त्यामध्ये नेतेमंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे शक्तीप्रदर्शन करत असतात. पण हे करताना अनेकदा ही मंडळी कायदा-सुव्यवस्था हातात घेताना दिसतात. पश्चिम बंगालमध्ये सध्या तसाच काहीसा प्रकार दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी शनिवारी सकाळी जाहीर केली. यामध्ये अनेक आतल्या गोटातल्या आणि ममता दीदींच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या इच्छुक उमेदवारांची तिकिटं कापली गेली. लगेच त्याचे पडसाद या इच्छुकांच्या कार्यकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या निषेधामध्ये दिसू लागले.

 

ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पक्षाच्या एकूण २९१ उमेदवारांची नावं जाहीर केली. मात्र, यामध्ये दक्षिण २४ परगणामधील भानगर भागातले पक्षाचे इच्छुक नेते अराबुल इस्लाम यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्याचा इस्लाम यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून निषेध तर केलाच, पण त्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क पक्ष कार्यालयातील सामानाची जाळपोळ करायला सुरुवात केली. पक्षाच्या नेतनहाट भागातील कार्यालयातल्या लाकडी खुर्च्या अराबुल इस्लाम यांच्या कार्यकर्त्यांनी तोडून त्यांची होळी केली. तसेच, रस्त्याच्या मध्येच ही जाळपोळ करत रस्ता देखील अडवून धरला.

अशाच प्रकारे दोन वेळेस आमदार राहिलेले रफिकुर रहमान या विद्यमान आमदारांचं तिकीट देखील ममता दीदींनी यंदा कापलं. त्यामुळे उत्तर २४ परगणामधील कार्यकर्त्यांनी रहमान यांना तिकीट नाकारल्याचा निषेध करण्यासाठी थेट राष्ट्रीय महामार्ग २४ अडवून धरला. तब्बल २ तास राष्ट्रीय महामार्ग जाम राहिल्यानंतर शेवटी सुरक्षा यंत्रणांनी आंदोलकांना बाजूला करून रस्ता पुन्हा खुला केला.

 

रहमान यांच्याप्रमाणेच, चार वेळा आमदार राहिलेले सतगचिया आणि सोनाली गुहा यांची देखील तिकिटं ममता दीदींनी कापल्यामुळे त्यांनी देखील तीव्र शब्दांमध्ये आपला रोष व्यक्त केला आहे. सोनाली गुहा यांना तर प्रसारमाध्यमांसोबत याविषयी बोलताना रडूच कोसळलं. हमसून हमसून रडतच त्यांनी ममता दीदींविषयीचा आपला राग व्यक्त केला. त्यानंतर सोनाली गुहा यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.

२७ मार्त रोजी पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.