रायदिघी (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप राज्यात जातीय कलह निर्माण करीत असल्याचा आरोप शनिवारी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ातील रायदिघी येथील एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

भाजपने पुरस्कृत केलेल्या हैदराबादमधील पक्षाच्या आणि बंगालमधील भाजपच्या घटकपक्षाच्या जाळ्यात अडकू नका कारण मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी ते सरसावले आहेत, असे आवाहन ममतांनी मुस्लीम समाजाला केले. एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि अब्बास सिद्दीकी यांच्या आयएसएफच्या संदर्भाने त्या बोलत होत्या.

भाजप जातीय दंगलींना चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत असून त्याबद्दल दक्ष राहावे आणि आपल्या परिसरात कलह निर्माण करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या उपऱ्यांना हाकलून द्यावे, असे आवाहन ममतांनी हिंदुंना केले आहे. आपण हिंदू आहोत, घरातून बाहेर पडताना चंडीमंत्राचे पठणही आपण करतो, परंतु प्रत्येक धर्माचा आदर करण्याच्या आपल्या परंपरेवर आपला विश्वास आहे, असे ममता म्हणाल्या. ममतांवर नेहमी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केल्याचा आरोप केला जातो, मात्र वरील वक्तव्य करून ममतांनी त्याला उत्तर दिल्याचे मानले जात आहे. भाजपचे नेते दलितांच्या घरी जाऊन भोजन करीत आहेत त्यावर टीका करताना ममता म्हणाल्या की, आपण ब्राह्मण आहोत, परंतु सदैव आपल्यासोबत असलेली महिला दलित आहे, ती महिला आपल्या गरजांची काळजी घेते आणि आपल्यासाठी स्वयंपाकही करते, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या. भाजपचे नेते पंचतारांकित हॉटेलातून भोजन आणून ते दलितांच्या घरात बसून खातात, असेही त्या म्हणाल्या.