पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातला सामना असंच चित्र आत्तापर्यंत होतं. मात्र, आता हे चित्र बदलू लागलं आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप भाजपाला आपला उमेदवार ठरवता आलेला नाही. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघात त्यांना कोण आव्हान देणार? हे मात्र भाजपानं ठरवलं आहे. पूर्वीचे तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि विद्यमान भाजपा नेते सुवेंदू अधिकारी आता ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम मतदारसंघात आव्हान देणार असून ममता दीदींची करीष्मा झाकोळून आपली छाप मतदारसंघावर उमटवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

ममता दीदी एकाच मतदारसंघातून लढवणार निवडणूक

शुक्रवारी ५ मार्च रोजी ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या २४१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये त्या स्वत: नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. विशेष म्हणजे, त्यांचा हक्काचा मानला जाणारा भोवानीपोरे मतदारसंघ टाळून त्यांनी स्वत:साठी नंदीग्राम मतदारसंघ निवडला आहे. शिवाय, दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा ‘सेफ गेम’ न खेळता त्यांनी या एकमेव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

सुवेंदू अधिकारी हे एकेकाळचे पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री. ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या गोटातले मानले जाणारे सुवेंदू अधिकारी हे मनमोहन सिंग सरकारमधील शिशिर अधिकारी यांचे पुत्र. गेल्या निवडणुकीमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी माकपचे दिग्गज नेते लक्ष्मण सेठ यांचा दीड लाखाहून जास्त मताधिक्याने पराभव करून आपला करीष्मा दाखवून दिला होता. मात्र, २०२०च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये त्यांचे ममता दीदींशी आणि पक्षातील इतर काही वरीष्ठ नेत्यांशी संबंध ताणले गेले. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात त्यांनी मंत्रीपदाचा देखील राजीनामा दिल होता. अखेर १७ डिसेंबर रोजी त्यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला, तर १९ डिसेंबर रोजी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

West Bengal Elections : नेत्याला तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांची जाळपोळ, रास्तारोको!

तृणमूलचेच माजी नेते, आमदार, खासदार आणि मंत्री राहिलेले सुवेंदू ममता दीदींच्या विरोधात योग्य पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे.