पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे आतापासूनच पडसाद उमटायला लागले आहेत. तृणमूल विरुद्ध भाजपा अशीच लढाई होताना दिसत आहे. भाजपानं पश्चिम बंगाल निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर ममता बॅनर्जींनीही भाजपाविरोधात गर्जना केली आहे. “हिंमत असेल तर भाजपानं मला अटक करून दाखवावी. मला अटक केली तरी तुरूंगातून निवडणुका जिंकून दाखवेन,” असा एल्गार ममतांनी केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची बांकुडा येथे जाहीर सभा झाली. यावेळी ममतांनी भाजपावर हल्ला केला. आमदारांच्या घोडेबाजाराचा मुद्दा उपस्थित करत ममता म्हणाल्या,”भाजपा राजकीय पक्ष नाही, तर खोट्याचा कचरा आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा तेव्हा तृणमूलच्या नेत्यांना धमकावण्यासाठी ते नरादा प्रकरण, शारदा चिटफंड घोटाळा काढतात. पक्षांतर करण्यासाठी भाजपा तृणमूलच्या आमदारांना पैशांचं प्रलोभन दाखवत आहेत. भाजपा देशाला मिळालेला शाप आहे,” असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.

पुढे बोलताना ममता म्हणाल्या,”मी त्यांना (भाजपा) स्पष्टपणे सांगतेय. मी भाजपाच्या एजन्सींना (केंद्रीय तपास यंत्रणा) घाबरत नाही. जर त्यांच्यात हिंमत असेल, तर मला अटक करून तुरूंगात टाकून दाखवावं. मी तुरूंगातून निवडणूक लढेन आणि तृणमूलला जिंकूनही देईन,” अशी गर्जना ममतांनी केली. “राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनाही तुरूंगात टाकलं. पण त्यांनीही सन्मानजनक विजय संपादित केला. बिहारमध्ये सत्तेत येण भाजपाच्या फोडाफोडीचे परिणाम आहेत. हा जनादेश नाही,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांसाठी पुढील वर्षी एप्रिल मे मध्ये निवडणुका होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तृणमूल आणि भाजपाने आतापासून मोर्चे बांधणी सुरू केली आहे. विशेषतः दोन्ही पक्ष आक्रमकपणे एकमेकांना उत्तर देताना दिसत आहे.