18 February 2019

News Flash

लग्नमांडवात भटजीचा मृत्यू; वधूपक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

वधू पक्षाच्या निष्काळजीपणामुळेच भटजीचा मृत्यू झाल्याचा आरोप

संग्रहित छायाचित्र

लग्न मांडवात भटजीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वधू पक्षाविरोधात स्थानिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वधू पक्षाच्या निष्काळजीपणामुळेच भटजीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार बेलघरियातील जतिन दास कॉलनीत राहणारे सुधन चौधरी यांच्या मुलीचा ५ फेब्रुवारी रोजी विवाह होता. या विवाह सोहळ्यात त्यांच्याच शेजारी राहणारे प्रणव चक्रवर्ती (६३) हे भटजी म्हणून उपस्थित होते.

लग्नाच्या धार्मिक विधी सुरु होण्यापूर्वी रात्री अकराच्या सुमारास प्रणव यांची प्रकृती खालावली होती, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र, सुधन चौधरी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रणव यांना घरी जाऊ दिले नाही, असा आरोप आहे. ‘मी दुसऱ्या लग्नात गेलो होतो. घरी परतल्यावर माझे वडिल घरी नव्हते. मी त्यांचा शोध घेतला असता ते शेजारच्यांच्या लग्नात गेल्याचे समजले. मी लग्नमांडवात गेलो असता वडील लग्नमांडवातच बेशुद्धावस्थेत पडून होते, असे त्यांच्या मुलाने माध्यमांना सांगितले. मी तातडीने वडिलांना रुग्णालयात दाखल केले. ७ फेब्रुवारी रोजी त्यांना कोलकात्यातील रुग्णालयात दाखल केले. मात्र शेवटी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे त्याने सांगितले.

रविवारी सुधन यांची मुलगी लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आली होती. स्थानिकांनी सुधन यांच्या घराबाहेर घोषणाबाजी सुरु केली. सुधन यांची मुलगी गार्गीने जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुधन यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जमावाने केली. या प्रकरणी स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार अर्जही दिला असून पोलिसांनी चौकशी सुरु असल्याचे सांगितले.

First Published on February 13, 2018 3:22 pm

Web Title: west bengal belgharia priest dies at wedding venue while performing rituals local demands action