पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता पुन्हा आल्यानंतर भाजपाला एकापाठोपाठ एक आमदार सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. भाजपाचे बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी सेनेटर हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मंत्री पार्थ चटर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये भाजपा आमदारांनी संख्या ७२ झाली आहे.

सोमवारी विष्णुपूरच्या भाजपा आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीपूर्वी विश्वजीत दास यांचा भाजपातील काही नेत्यांसोबत वाद झाला होता. विश्वजीत दास हे मुकुल रॉय यांचे समर्थक मानले जातात. मुकुल रॉय यांनी निवडणुकीनंतर घरवापसी केली. त्यानंतर विश्वजीत दास यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. “भाजपा सुडाचं राजकारण करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून पश्चिम बंगालमधील नागरिकांच्या अधिकारावर गदा आणत आहेत. मी सर्व नेत्यांना जनतेच्या भल्यासाठी ममता बॅनर्जी यांना साथ देण्याची विनंती करतो”, असं विश्वजीत दास यांनी सांगितलं.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाचे ७७ आमदार जिंकून आले होते. तर ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा सत्ता प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरल्या होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर खासदार निशिथ प्रमाणिक आणि जगन्नाथ सरकार यांनी राजीनामा दिला होता. कारण खासदारपदी राहण्याचे आदेश केंद्रीय नेतृत्वाने दिले होते. त्यामुळे ही संख्या ७५ वर पोहोचली होती. त्यानंतर मुकुल रॉय आणि विष्णुपूरचे आमदार तन्मय दास यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज विश्वजीत दास यांनी भाजपामधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ही संख्या ७२ झाली आहे.