पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. भाजपाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर या हत्येचा आरोप ठेवला आहे. तर प्राथमिक तपासात या हत्येमागे कोणताही राजकीय हेतू दिसला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. रविवारी रात्री २४ परगना जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील अमेठीत भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यानंतर देशभरात झालेली ही तिसरी हत्या आहे.

चंदन शॉ असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालमध्ये वेगाने उदयाला आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षांच्या अनेक घटना राज्यभर घडल्या आहेत. प्रथमच भाजपाने पश्चिम बंगालमध्ये १८ जागेवर यश मिळवले आहे. निकालानंतर पश्चिम बंगाल राज्याच्या इतरही भागात तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयांची मोडतोड करण्याच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी परस्परांवर केला.

आणखी वाचा :  सिंह यांचा खूनी पाताळात लपला तरीही शोधू – स्मृती इराणी 

उत्तर २४ परगना जिल्ह्यातील भाटापारामध्ये रविवारी रात्री भाजपा कार्यकर्ते चंदन शॉ यांची अज्ञांतानी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी २५ वर्षीय भारत बिश्वास यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात घेऊन जाताना बिश्वास यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आरोपाचे खंडन केले आहे. ते म्हणाले की, हत्या झाली तेव्हा आपण घटनास्थळी उपस्थित होतो, मात्र आपले लक्ष मोबाइलमध्ये असल्याचे सांगितले.