भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर बुधवारी सकाळी मोठा बॉम्बस्फोट झाला. राज्यपाल जगदीप धनखर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा मतदारसंघातील भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर तीन बॉम्ब फेकण्यात आले. घरात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत असताना ही घटना घडली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे.

घरावर बॉम्ब फेकले तेव्हा खासदार आणि प्रदेश भाजपा उपाध्यक्ष अर्जुन सिंह उपस्थित नव्हते. मात्र त्यांचे कुटुंबीय त्यावेळी घरी होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यावरुन बॉम्ब फेकणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.

हा हल्ला करणाऱ्यांचा आता शोध घेतला जात आहे. या घटनेबाबत ट्विट करत राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबण्याची चिन्हे नाहीत. खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट झाले आहेत, जो कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. मला आशा आहे की या प्रकरणी बंगाल पोलिसांकडून त्वरित कारवाई केली जाईल. त्यांच्या सुरक्षेबाबत यापूर्वीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर बंगालमधील निवडणूकोत्तर हिंसाचाराच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत,” असे राज्यपाल जगदीप धनखर यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणांची सीबीआय चौकशी करत आहे. खून, बलात्कार आणि हिंसाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये सीबीआयने तक्रार नोंदवून अनेक लोकांना अटकही केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यापूर्वी मानवाधिकार आयोगाच्या पथकाने राज्यातील हिंसाचारग्रस्त भागाला भेट देऊन उच्च न्यायालयाला अहवाल दिला होता. त्या अहवालाच्या आधारे तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, राज्यातील ममता सरकार या तपासाला विरोध करत असून उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.