पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी लालू आलम यांची तब्बल २९ वर्षांनी न्यायालयाकडून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्या युथ काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. अलीपूर कोर्टाने लालू आलम यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याने तसंच आता इतक्या प्रदीर्घ काळानंतर कोणी साक्षीदार पुढे येण्याची शक्यता नसल्याने सुटका केल्याची माहिती वकिलांनी दिली आहे.

“आरोपपत्रात ज्यांची नावे आहेत त्यापैकी काहींचा मृत्यू झाला असून, इतर फरार आहेत. या केसमध्ये आता काहीच राहिलेलं नाही. या प्रकरणात उगाच वेळ आणि पैसा खर्च होत असून यामधून काहीही निष्पन्न होणार नाही हे सरकारच्या लक्षात आलं आहे,” अशी माहिती सरकारी वकील राधाकांत मुखर्जी यांनी दिली आहे. जाणुनबुजून हे प्रकरण २१ वर्ष ताटकळत ठेवण्याच आलं असा आरोप यावेळी त्यांनी केला.

आपल्या सुटकेवर प्रतिक्रिया देताना लालू आलम यांनी सांगितलं आहे की, “मला खूप दिलासा मिळाल्यासारखं वाटत आहे. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. ममता बॅनर्जी आता मुख्यमंत्री असल्याने माझ्या मनात भीती होती. सरकारने २०११ रोजी जेव्हा ममता बॅनर्जी यांनी राज्याचं नेतृत्त्व स्वीकारलं तेव्हाच निर्णय घेतला असता तर मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकलो असतो”. मुख्यमंत्री आपल्या चुकीसाठी आपल्याला माफ करतील अशी अपेक्षा याआधी त्यांनी व्यक्त केली होती.

काय झालं होतं ?
१६ ऑगस्ट १९९० रोजी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला होता. कालीघाट परिसरात हा हल्ला कऱण्यात आला होता. मुख्य आरोपी आलम याने ममता बॅनर्जी यांच्या डोक्यावर काठीने वार केला होता. यामुळे ममता बॅनर्जी यांच्या कवटीला फ्रॅक्चर झालं होतं. यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर अनेक आठवडे रुग्णालयात उपचार सुरु होते. १९९४ रोजी ममता बॅनर्जी साक्षीदार म्हणून अलीपूर कोर्टात उपस्थितदेखील राहिल्या होत्या.

२०११ मध्ये एका मुलाखतीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी १६ ऑगस्ट १९९० हा एकमेव दिवस आहे जेव्हा आपण आपल्या आईला कुठे चाललो आहोत हे न सांगता घराबाहेर पडलो होतो अशी माहिती दिली होती. २०११ मध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतर आलम यांनी आपल्या कृत्यासाठी माफी मागितली होती.