आसाममधील ज्या बंडखोरांनी अद्याप शरणागती पत्करलेली नाही त्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे कारण आत्मनिर्भर आसामच्या निर्मितीसाठी त्यांची गरज आहे, असे कळकळीचे आवाहन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बोडोलॅण्डच्या बाकसा जिल्ह्य़ात एका जाहीर सभेत ते बोलत होते.

विकास, शांतता, ऐक्य आणि स्थैर्य यासाठी राज्यातील जनतेने हिंसाचाराला नाकारले आहे, काँग्रेसने हिंसाचाराला नेहमीच खतपाणी घातले, असा आरोप मोदी यांनी केला. अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर जे मुख्य प्रवाहामध्ये सहभागी झाले त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी आपली आहे, असेही ते म्हणाले.

राज्यातील ज्या बंडखोरांनी अद्याप शरणागती पत्करलेली नाही त्यांनी राज्याच्या आणि स्वत:च्या भवितव्यासाठी मुख्य प्रवाहामध्ये सहभागी व्हावे कारण आत्मनिर्भर आसामच्या निर्मितीसाठी त्यांची गरज आहे, असे कळकळीचे आवाहन मोदी यांनी केले.

सभेला मोठय़ा प्रमाणावर महिला उपस्थित होत्या त्या संदर्भाने मोदी म्हणाले की, आपली मुले आता शस्त्रे उचलून पुन्हा जंगलाकडे जाणार नाहीत याची प्रत्येक मातेला खात्री आहे. बोडोलॅण्डमधील प्रत्येक माताभगिनीला आपण आश्वासन देतो की, तुमच्या मुलांच्या स्वप्नांची पूर्तता होईल, त्यांना शस्त्रे हाती घ्यावी लागणार नाहीत किंवा गोळ्यांना बळी पडावे लागणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

 तृणमूलमुळे प. बंगाल वंचित मोदी यांचा आरोप

हरिपाल (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या अडथळे निर्माण करण्याच्या मानसिकतेमुळेच उद्योगधंदे आणि रोजगार यापासून राज्य वंचित राहिले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केला. सिंगूरमधील आंदोलनाचा (२००६-०८) संदर्भ देताना मोदी म्हणाले की, या आंदोलनामुळे टाटा मोटर्सला आपला प्रकल्प तेथून हलवावा लागला आणि ती जागा तृणमूल काँग्रेसने राजकीय उद्दिष्टासाठी वापरली आणि जनतेला वाऱ्यावर सोडले. जनता पैसै घेऊन भाजपच्या सभेला गर्दी करीत असल्याचे वक्तव्य करून ममतांनी राज्यातील जनतेच्या स्वाभिमानाला इजा पोहोचविली आहे, असा दावाही मोदी यांनी केला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र  आणि निवडणूक आयोग  यांच्यावर  ममता नेहमीच  टीका करतात. खेळाडूंनी पंचांवर टीका सुरूच ठेवली तर त्यांचा खेळ खल्लास हे आपल्याला माहिती आहेच, असे मोदी  म्हणाले.