पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्राद्वारे निवडणुका लढण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी जगभरातील अशा ६५ देशांमधील व्यवस्थेचा दाखला देखील दिला आहे की, ज्या ठिकाणी निवडणुका लढण्यासाठी पक्षांना केंद्र सरकार आर्थिक मदत पुरवते. ममता यांनी पत्राद्वारे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी थांबवण्यासाठी निडवणूक प्रक्रियेतील सुधारणांबाबत सांगितले आहे. तसेच, ज्याप्रकारे ६५ देशांमध्ये केली जाते त्याप्रकारे सरकाराने निवडणुकांसाठी आर्थिक मदत करण्याची आता वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय ममता यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये करण्यात आलेल्या अमाप खर्चाबाबत चिंताही व्यक्त केली आहे. एवढेच नाहीतर त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील खर्चाबद्दलच्या एका अहवालाचा दाखला देत म्हटले की, ही निवडणूक जगातली सर्वात खर्चिक निवडणूक होती. तसेच, २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुप्पट खर्च झाल्याचेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीत किमान ६० हजार कोटी रूपये खर्च झाला असून हा आकडा यापेक्षा अधिक नेमका किती असेल हे सांगू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारतात स्वतंत्र, पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी निवडणूक प्रक्रियेत तत्काळ सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ममता यांनी भ्रष्टाचाराबाबत चिंता व्यक्त करत पंतप्रधानांना निवडणूक निधीच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची देखील मागणी केली.