विधानसभा निवडणुकींमुळे पश्चिम बंगाल मधील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये प्रचार करताना पायाला दुखापत झाली होती.त्यांच्यामते चार-पाच जणांच्या टोळीने त्यांना लक्ष्य केले होते. मागील आठवड्यात बुधवारी त्या मंदिराच्या बाहेर प्रार्थनेसाठी थांबलेल्या असताना या टोळीने त्यांना धक्का दिला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकां आणखीन रंगणार याचे चिन्ह दिसत आहे.

रविवारी पुन्हा ममता बॅनर्जी प्रचारासाठी कोलकाताच्या रस्त्यांवर परत आल्या. मुख्य म्हणजे यावेळी त्या व्हीलचेअरवर होत्या. त्यांना  रुग्णालयातून घरी सोडून केवळ दोनच दिवस झाले आहेत.

कोलकात्ताच्या मध्यभागी असलेल्या मेयो रोड ते हाजरा येथे मुख्यमंत्री विशाल मेळाव्याचे नेतृत्व करताना दिसल्या. तेथे त्या भाषण करणार आहेत. त्यांचा रोड शो सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, “आम्ही धैर्याने लढा सुरूच ठेवू! मला अजूनही खूप वेदना होत आहेत, पण मला माझ्या लोकांच्या वेदनादेखील अधिक जाणवत आहेत. आमच्या सन्माननीय भूमीचे रक्षण करण्यासाठी या लढाईत, आम्ही बरेच काही सहन केले आहे आणि अधिक त्रास सहन करावा लागला तरी आम्ही कधीही झुकणार नाही! ”

त्या नंदीग्रामहून परत आल्यानंतरची त्यांची ही पहिलीच सार्वजनिक सभा आहे. त्याआधी रविवारी ममता बॅनर्जी यांनी २००७ मध्ये नंदीग्राम येथे पोलिस गोळीबारात ठार झालेल्या आंदोलकांना श्रद्धांजली वाहिली आणि पीडितांच्या सन्मानार्थ आणि बंगालविरोधी शक्तींशी लढण्यासाठी त्यांनी हा मतदारसंघ निवडला आहे असे त्या म्हणाल्या. २००७ मध्ये भूसंपादनाच्या विरोधातील हल्ल्यात ठार झालेल्या १४ जणांच्या सन्मानार्थ टीएमसीने  १४ मार्चला ‘नंदीग्राम दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय आक्रोश वाढला होता आणि कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते