पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि केद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपाला समुदायांमध्ये दंगे आणि द्वेष पसरवणारा नवा धर्म असं संबोधित केलं. यावेळी राष्ट्रगीत बदलण्याच्या मागणीवरूनही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. हिंमत असेल तर राष्ट्रगीत बदलून दाखवावं त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल असं म्हणत भाजपा बंगालला दंगलग्रस्त गुजरातमध्ये बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रगीत बदलण्यासंदर्भात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र लिहिलं होतं. यावरही ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं. “जर भाजपानं असं काही करण्याचा प्रयत्न केला तर राज्यातील जनता त्यांना योग्य ते उत्तर देईल. ते आपल्या देशाचा इतिहास बदलू इच्छित आहेत. आपलं राष्ट्रगीत बदलण्याच्या गोष्टी त्या करत आहेत,” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी संबोधित करताना सीएए आणि एनपीआरच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. “सीएए आणि एनपीआरमुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आम्ही पश्चिम बंगालमध्ये निर्वासितांच्या कॉलनींना मान्यता दिली आहे. भाजपा कधीही गोरखालँडबाबत समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढू शत नाही. केवळ तृणमूल काँग्रेसचं असं करू शकते,” असंही त्यांनी नमूद केलं.

सरकारमध्ये हिंमत असेल तर…

“आयपीएस अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून केंद्र सरकार राज्याच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करत आहे,” असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. तसंच पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यावरूनही त्यांनी आव्हान दिलं. भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या ताफ्यावर कोणताही हल्ला झाला नसल्याचंही त्या म्हणाल्या.