ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगणा या ठिकाणाहून जात होत्या. त्यावेळी रस्त्यावरच्या काही लोकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. ज्यानंतर ममता बॅनर्जी यांचा चांगलाच संताप झाला. त्या कारमधून उतरल्या आणि त्यांनी घोषणा देणाऱ्यांना थेट आव्हान दिलं. तसेच हे सगळे पश्चिम बंगालमधले लोक नाहीत तर बाहेरून आलेले भाजपाचे लोक आहेत असाही आरोप त्यांनी केला. हे सगळे गुन्हेगार आहेत आणि माझ्याबाबत ते अपशब्द वापरत आहेत असाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. हे लोक बंगालमधले असूच शकत नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. अत्यंत संतापात त्या तातडीने कारमध्ये बसून पुढे निघून गेल्या. मात्र घोषणा देणाऱ्यांविरोधात कारवाई करू असे त्यांनी जाता जाता प्रसारमाध्यमांना सांगितले. एएनआयने या संदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान जय श्रीराम या घोषणांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. भाजपाने प्रभू रामचंद्रांच्या नावाचं राजकारण केलं आहे. निवडणुका आल्या की भाजपाला रामाची आठवण येते असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. तर प्रभू रामचंद्रांच्या नावाने दिलेल्या घोषणा ममता बॅनर्जी यांना चालत नाहीत मात्र मी त्या देणारच हिंमत असेल तर ममता बॅनर्जी यांनी मला अटक करून दाखवावी असं आव्हान भाजपा नेते अमित शाह यांनी दिलं होतं. या सगळ्यावरून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकारण चांगलंच रंगलं होतं. पश्चिम बंगालमध्ये काही प्रमाणात हिंसाचारही उसळला होता.

आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या दिवशीच ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमधून फिरताना काही जणांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. ज्यानंतर कारमधून उतरत ममता बॅनर्जी यांनी घोषणा देणाऱ्यांना कारवाई करणार असल्याचे दटावले. तसेच हे भाजपाचे लोक आहेत ते बंगालचे नाहीत तर बाहेरचे आहेत आणि माझ्याबाबत अपशब्द वापरत आहेत असाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.