पश्चिम बंगालमध्ये भाजपा विरूद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यातील सुरू असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला होता. त्यानंतर भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. त्यातच आता एकमेकांचे पक्ष कार्यालय कथितरित्या आपल्या ताब्यात घेण्याचे प्रकार सुरू झाले असून यात आता खुद्द पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच उडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील नैहाटी परिसरातील भाजपाच्या कार्यालयाचे टाळे तोडून कार्यालयाच्या भिंतीवर तृणमूल काँग्रेस पक्षाचे चिन्ह रंगवल्याचा प्रकार घडला. गुरूवारी 30 मे रोजी हा नाट्यमय प्रकार घडला.

ममता बॅनर्जी यांनी ज्या कार्यालयाचे टाळे तोडले ते कार्यालय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले होते, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. भाजपाचे नवनिर्वाचित खासदार अर्जुन सिंग यांच्या समर्थकांनी हे कार्यालय ताब्यात घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी या ठिकाणी निदर्शने केली. तसेच जमावाला संबोधित केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपा कार्यालयाचे टाळे तोडून भिंतीवर तृणमूल काँग्रेस पक्षाचे चिन्ह रंगवले आणि कार्यालय पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान, आपल्या ताफ्याजवळ जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्यांना ममतांनी फटकारले होते. तसेच ते सर्वजण बाहेरचे आणि भाजपाचे लोक असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच त्या लोकांनी आपल्याशी गैरवर्तन केले असून ते गुन्हेगार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. यानंतर भाजपानेही ममता बॅनर्जी यांना जय श्रीराम लिहिलेले 10 लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर कथितरित्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ब्लॉक आणि गाव स्तरावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयांना भगव्या रंगाने रंगवल्याचे सांगण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी 18 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. तर तृणमूल काँग्रेसला 22 जागांवर विजय मिळवता आला. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 34 जागांवर विजय मिळाला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूलच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या कार्यालयांना भाजपाच्या कार्यालयांच्या रूपात बदल्याण्यात आल्याचे सांगण्यात दावाही करण्यात येत आहे.